पुणे: सध्या सोशल मीडियावर एक क्लिप हजारांच्या संख्येने शेअर केली जात आहे. ह्या क्लिप मध्ये महानगरपालिकेतील एक कामगार कचऱ्याची समस्या आपल्या गाण्यातून सांगताना दिसत आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे; परंतु महादेव जाधव यांनी यामधून एक गंभीर विषय लोकांपर्यंत पोचावा असा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ बघताना लोक त्या व्हिडिओची मजा घेत आहे परंतु त्यामागील त्या व्यक्तीची भावना किती जणांपर्यंत पोहोचत असेल.
व्हिडिओच्या सुरुवातीस महादेव जाधव यांनी सुका कचरा आणि ओला कचरा याचा उल्लेख केला आहे. ते म्हणताहेत की सुका कचरा आणि ओला कचरा हा लोकं बिनधास्तपणे प्लास्टिकच्या कॅरीबॅग मध्ये एकत्र कोंबून रस्त्यावर फेकत आहेत. बरेच जण असे म्हणत आहेत की, काम कुठलेही असो एन्जॉय करता आले पाहिजे; परंतु जाधव एन्जॉय करण्याच्या हेतूने हे करत नाही तर लोक सर्रास कचरा रोडवर फेकून देतात त्यातही ओला आणि सुका कचरा एकत्रच टाकलेला असतो. रोडवर कचरा टाकणे हे जेवढे सोपे काम आहे त्यापेक्षा हजारो पट तो कचरा सुका आणि ओला असा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावणे हे आहे.
सदर गाण्यामधून महादेव जाधव आपली व्यथा मांडताहेत. एकतर स्वच्छ पुणे सुंदर पुणे असे म्हटले जाते आणि दुसऱ्या बाजूला रोड कचऱ्याच्या ठिकाणे विद्रूप झालेले दिसत आहेत. रोडवर टाकलेला हा कचरा गोळा करताना त्यातून येणारा घाण वास, झालेले मच्छर, कचऱ्यामध्ये असलेल्या काचा किंवा धातू त्यांच्यामुळे होणाऱ्या जखमा या गोष्टींचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. रस्त्यावरील मोकाट जनावरे हा कचरा पंगवतात. तो गोळा करता करता कामगारांना नाकीनऊ येते. ज्याप्रमाणे सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे त्याप्रमाणे त्यातून मांडली गेलेली समस्या लोकांच्या मनामध्ये व वागणुकी मध्ये व्हायरल होईल का हा मोठा प्रश्न आहे?