नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना ५ लाखाची लाच घेतांना अटक

अहमदपूर, लातूर, १६ फेब्रुवारी २०२४ : स्थानिक प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्याला लाच घेताना; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपरिषद येथील आहे. येथील नगरपरिषदचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना ५ लाख रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

मिळेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्या मौजे मरशिवणी ता. अहमदपूर जि. लातूर येथील सर्वे नंबर ५६ मधील ३६०० चौ. मी. क्षेत्रास वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली असून, त्यामध्ये अंतिम परवानगी मिळण्याकरिता नगर परिषद अहमदपूर जि.लातूर येथे दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये २५ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रारदार यांनी ऑनलाइन चलान भरणा केलेला आहे.

तक्रारदार हे त्यांचे प्रलंबित कामाकरिता ५ फेब्रुवारी २०२४ रोजी नगर परिषद कार्यालय, अहमदपूर येथे गेले असता वर नमूद लोकसेवक क्रमांक २ यांनी तक्रारदार यांना त्यांचे प्रलंबित कामाकरिता स्वतःसाठी व मुख्याधिकारी नगरपरिषद अहमदपूर यांच्यासाठी असे मिळून एकूण ७ लाख रुपये लाचेची मागणी केली.

तर दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक क्र. १ आणि २ यांनी ७ लाख रूपये लाचेची मागणी केल्याचे व तडजोडी अंती ५ लाख रूपये स्विकारण्याचे मान्य केले आहे. त्यानंतर थोड्यावेळाने तक्रारदार नगरपरिषद, अहमदपूर येथे गेले असता क्रमांक २ यांनी तक्रारदार यांच्या क्रेटा कारमध्ये लाचेची रक्कम ५ लाख रूपये शासकीय पंचांसमक्ष स्वतः स्विकारली आहे.

दोन्ही आरोपीस सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन अहमदपूर जि. लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजमोहम्मद

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा