Kamal Vyavahare rejoins Congress: विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा जागेसाठी आग्रही मागणी करणाऱ्या माजी महापौर कमल व्यवहारे यांना तिकिट नाकारल्यावर बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. पक्षाने कसब्यातून ज्यांना तिकिट दिले त्यांची वैचारिक निष्ठा काँग्रेस पक्षाशी नाही, ते पक्ष सोडतील असा आक्षेप त्यावेळी कमल व्यवहारे यांनी घेतला होता. अधिकृत उमेदवारविरोधात उमेदवारी कायम ठेवल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. नुकताच कसब्यातील त्यावेळच्या काँग्रेस अधिकृत उमेदवाराने पक्ष सोडला.
कमल व्यवहारे यांनी घेतलेले आक्षेप खरे ठरले. आगामी मनपा निवडणुकीत जून्या जाणत्या, अनुभवी, निष्ठावंत काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांशी प्रदेश पातळीवरून संवाद साधण्यात आला. शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यातूनच महिला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष राहिलेल्या, माजी महापौर कमल व्यवहारे यांची घरवापशी झाली. येणाऱ्या काळात शहर काँग्रेस मनपा निवडणूक सर्व शक्तिनीशी लढण्याच्या तयारीत आहे.
या बद्दल बोलताना शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, “कसबा विधानसभा मतदार संघातील प्रभागात कमल व्यवहारे यांना मानणारा मोठा मतदार आहे. बँकिंग, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कमल व्यवहारे यांची सर्व राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातच झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील शिस्तभंग कारवाई मागे घेण्यात आली.”
कमल व्यवहारे यांना याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या….
“माझी राजकीय सुरुवात काँग्रेस पासून झाली आहे. नगरसेवक, महापौर, महिला प्रदेश अध्यक्ष पदावर मी आजवर निष्ठापूर्वक काँग्रेसचे काम केलं आहे. काँग्रेस विचार आणि संघटनेसाठी कार्यरत राहणे ही शिकवण मी विसरले नाही. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळावे म्हणून काम करण्याचा संकल्प करून मी पुन्हा पक्षात सक्रिय होतं आहे. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, संघटन सरचिटणीस गणेश पाटील यांचे आभार माणून शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, उपाध्यक्ष रमेश बागवे, उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार उल्हास पवार, सरचिटणीस दीप्ती चौधरी, सरचिटणीस अभय छाजेड, सरचिटणीस संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, बाळासाहेब धाबेकर, अजित दरेकर, रफिक शेख, अविनाश बागवे, यासह सर्व आजी माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत मनपा निवडणुकीत काँग्रेसच्या यशासाठी सक्रिय राहीन. “












































