Sahitya Akademi Award 2025: मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानास्पद क्षण! साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या मराठी कादंबरीस साहित्य अकादमी युवा पुरस्कार आणि बालसाहित्यकार तसेच शिक्षणतज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने 23 भारतीय भाषांमधील 2025 च्या युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली असून, मराठी साहित्याने यात आपली छाप उमटवली आहे.
डॉ. सुरेश सावंत यांचे बालसाहित्यातील योगदान:
डॉ. सुरेश सावंत यांनी बालसाहित्याच्या क्षेत्रात आपली अनोखी छाप सोडली आहे. मुलांसाठी लिहिताना त्यांनी स्वतःला मूल बनवून त्यांच्या मनातील भावविश्व टिपले आहे. त्यांचे लेखन मनोरंजनासोबतच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ज्ञानार्जनाची गोडी निर्माण करते. प्रयोगशील शिक्षणतज्ञ म्हणून त्यांनी बालशिक्षण आणि वाचन संस्कृतीसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. उच्च माध्यमिक शाळेत अध्यापन, मुख्याध्यापक म्हणून प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना त्यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र, समीक्षा आणि संशोधन अशा विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांच्या 33 बालसाहित्य पुस्तकांपैकी तीन पुस्तकांना यापूर्वी राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
प्रदीप कोकरे यांचे वास्तवदर्शी लेखन:
कादंबरीकार प्रदीप कोकरे यांचे लेखन सामाजिक वास्तवाचे कठोर चित्रण करते. त्यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीत गरीबी, बेरोजगारी आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनाचे मार्मिक चित्रण आहे. सामाजिक प्रश्नांना परखडपणे भिडणाऱ्या या कादंबरीने मराठी साहित्याला एक नवा आयाम दिला आहे. हा पुरस्कार मराठी साहित्यविश्वाचा गौरव असून, समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा आहे, असे साहित्य अकादमीने नमूद केले आहे.
पुरस्काराचे स्वरूप;
साहित्य अकादमी पुरस्कारांतर्गत विजेत्यांना ताम्रपट, शाल आणि 50,000 रुपये रोख बक्षीस देण्यात येते. दिल्लीत साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर झाले.
उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन;
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या यशाबद्दल दोन्ही साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमुळे मराठी भाषेचा अभिजात दर्जा अधिक उजळला आहे. यामुळे नव्या पिढीला मराठी साहित्याकडे आकर्षित होण्यास प्रोत्साहन मिळेल.”
मराठी साहित्याचा गौरव;
या पुरस्कारांमुळे मराठी साहित्याची समृद्धी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रदीप कोकरे आणि डॉ. सुरेश सावंत यांच्या लेखनाने मराठी साहित्याला नवी उंची गाठली असून, त्यांच्या या यशाबद्दल मराठी साहित्यप्रेमींकडून त्यांचे कौतुक होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; प्रज्ञा शिंदे













































