मुंबई: बॉलिवूडमध्ये क्वीन म्हणून ओळखली जाणारी अष्टपैलू अभिनेत्री कंगना रानौत आता चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणार आहे.
अयोध्येतील राम मंदिर आणि खटला या विषयावर ‘अपराजित अयोध्या’ या चित्रपटाची निर्मिती कंगना करणार आहे. कंगनाने या आधी ‘मणिकर्णिका’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते.
याबाबत माहिती देताना कंगना म्हणाली की, बाहुबली या लोकप्रिय चित्रपट सीरिजचे निर्माते के.वी विजयेंद्र प्रसाद ‘अपराजित अयोध्या’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ या निर्मिती संस्थेकडूनच या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. कंगना पुढे म्हणाली की, अयोध्येच्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीवर नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
हा मुद्दा एकप्रकारे माझ्या खासगी आयुष्याशी निगडित असून तो माझा प्रवासही दाखवतो. माझ्या कंपनीकडून निर्मिती होत असलेल्या पहिल्या चित्रपटासाठी यापेक्षा जास्त चांगला विषय असू शकत नाही. दरम्यान, कंगना सध्या जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित ‘थलाइवी’ नावाच्या चित्रपटामध्ये व्यस्त आहे.