कन्नौज: उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात प्रवाशांनी भरलेली बस बघता बघता आगीचा गोळा बनली. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ लोक जखमी अवस्थेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदींनी शनिवारी सकाळी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे भीषण रस्ता अपघाताबद्दल जाणून घेताना फार वाईट वाटले. या अपघातात अनेक लोकांनी प्राण गमावले आहेत. मृतांच्या नातेवाईकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो तसेच जखमींनाही लवकरच बरे होण्याची प्रार्थना करतो.’
त्याचवेळी राहुल गांधी म्हणाले की, ‘कन्नौज दुर्घटनेत २० लोकांचा मृत्यू आणि अनेक लोक जखमी झाल्याच्या बातमीने मला दु: ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करतो.’ प्रियंका गांधी वड्रा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करत बाधित कुटुंबे व प्रवाशांना सर्वतोपरी मदत करावी असे सांगितले.
या खासगी बसमध्ये ४० हून अधिक लोक होते. बस फर्रुखाबादहून जयपूरकडे जात होती. काल रात्री साडेआठच्या सुमारास कन्नौजमधील घिलोई गावाजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर होताच बसच्या डिझेलच्या टँकला आग लागली आणि इतक्या वेगाने पसरली की बर्याच लोकांना बसमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.