नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२२ : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू असताना या दरम्यान गोव्यात राजकीय भूकंप होऊन काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपमध्ये गेले आणि गोव्यात काँग्रेसला मोठ खिंडार पडलं. तर आज जम्मू कश्मीरचे शेवटचे महाराजा हरिसिंह यांचा पुत्र आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते करण सिंह यांनी काँगेस बाबत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते करण सिंह यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या मनातील खंत व्यक्त केलीय. ते म्हणाले की, मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे. पण माझे पक्षासोबत संबंध शून्य झाले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात होणाऱ्या कामाचं कौतुक ही केलं आहे, त्यामुळं ते आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झालीय.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते करण सिंह म्हणाले की, मी सन १९६७ मध्ये काँग्रेस पक्षाचा सदस्य झालो. पण गेल्या ८ ते १० वर्षापासून मी संसदेत गेलेलो नाही. पण, हो मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे. माझा काँग्रेसच्या कोणत्याही नेते, पदाधिकाऱ्याशी कोणत्याही संपर्क नाही. तर कोणीही मला काहीही विचारत नाही. तसे तर माझं काम मीच करत आहे. पण, काँग्रेस पक्षासोबत माझं नातं आता जवळपास शून्य झाला आहे.
पुढे करण सिंह बोलतात की, जम्मू कश्मीर सरकारने महाराजा हरिसिंह यांच्या जन्मदिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करून केलेल्या प्रयत्नांना यश आणले आहे. याबद्दल करण सिंह यांनी आनंद व्यक्त केला असून खूप प्रयत्नानंतर हे घडल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रयत्नांना पुढे नेणाऱ्या जम्मूच्या तरुण पिढीचे मी आभार व्यक्त करतो. सर्वांनी एकत्र येऊन हे करून दाखवले याला कोणीही विरोध केला नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना ही व्यक्त केल्या आहेत. माझी मुलं जम्मू आणि काश्मीरच्या विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांनी हा ठराव सादर केला होता. पण हा ठराव कोणीही पुढे नेला नव्हता. पण आता ते शक्य झालं आहे. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. यासंदर्भात मी त्यांना पत्रही पाठवलं होतं असंही करण सिंह यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे