रत्नागिरी, ३१ जानेवारी २०२४ : लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून साकारलेल्या कारगिल विजय रजत महोत्सवाचे आयोजन रत्नागिरीत शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी कै. प्रमोदजी महाजन क्रीडा संकुल येथे संध्याकाळी ४ ते ६.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. १९९९ चे कारगिल युद्धात ज्यांनी १६००० फूटाच्या उंच पहाडावर, रात्रीच्या निबिड अंधारामध्ये, उणे २०° तापमान, शत्रूकडून सातत्याने होणारा गोळीबार अशा प्रतिकूल परिस्थितीत शत्रूला चारी मुंड्या चीत करुन, पॉईंट ५१४० आणि ४८७५ वर तिरंगा फडकवला, असे वीरचक्राने सन्मानित ब्रिगेडीयर भास्कर आणि या युद्धभूमीवर आपल्या वैद्यकीय कौशल्याने १०८ जणांवर उपचार करून जीवदान देणारे सैनिकांचे देवदूत डॉ. कर्नल राजेश अढाऊ या कार्यक्रमात उपस्थित रहाणार आहेत. तसेच लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. अनुराधा प्रभुदेसाई या दोनही योध्यांसोबत कारगिल युद्धाच्या चित्तथरारक अनुभवाबद्दल दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाद्वारे युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवण्याचा व राष्ट्र प्रथम या विचाराचा जागर करण्याचा तसेच सुजाण आणि विवेकी युवक निर्माण करण्याचा लक्ष्य फाउंडेशनचा प्रयत्न आहे. याकरिता रत्नागिरी शहरातील शाळांमधून आठवी ते बारावीचे ५००० विद्यार्थी उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना माननीय शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत यांनी सर्व शाळांना दिल्या आहेत.
‘मेरा देश, मेरी पहचान’ ह्या कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे याकरिता रत्नागिरीतील माजी सैनिक श्री. मोहन सातव, श्री. शंकर मिलके, श्री. विजय आंबेरकर तसेच श्री. नंदू चव्हाण यांनी शहरातील आणि शहर परिसरातील सर्व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवण्याचा व राष्ट्र प्रथम या विचाराचा जागर करण्याचा तसेच सुजाण आणि विवेकी युवक निर्माण करण्याचा आग्रह मुळातच पालकांनी केला पाहिजे, अशा स्वरूपाचे राष्ट्रीय कार्यक्रमांना आपल्या मुलांना आवर्जून घेऊन गेले पाहिजे अशी विनंती आयोजकांच्या वतीने सुहास ठाकूर देसाई यांनी केली आहे.
तसेच माध्यमिक शाळांमध्ये दहा शैक्षणिक मूल्यांपैकी राष्ट्र भक्ती हे एक महत्त्वाचे मूल्य आहे. सर्व शिक्षक व मुख्याध्यापक हे यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत असतात मात्र सैनिकांचा सहभाग व विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी संवाद या आशयाचा हा कार्यक्रम प्रथमच रत्नागिरीत होत आहे याची माहिती श्री राजेश आयरे यांनी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – केतन पिलणकर