पुणे: पतीच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील एक आजीबाई चक्क पाणीपुरी विकून कुटुंबाला हातभार लावताना पहायला मिळत आहे. वयाच्या ७५ पतीचे निधन झाले. त्या दुःखाचा आणि कर्जाचा डोंगर पेलवणाऱ्या ही आजीबाई आज आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. त्यांचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांना हळूहळू मदतीचा ओघ सुरू झाला आहे.त्यातच वडगाव शेरी येथील काकासाहेब गलांडे यांनी आजींना पंचवीस हजारांची मदत केली आहे.
पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी परिसरात लज्जतदार पाणीपुरी खाऊ घालणाऱ्या चंद्रभागा शिंदे. त्यांनी पतीच्या उपचारासाठी मुलाने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी चंद्रभागा शिंदे या स्वत: पाणीपुरी विकत आहेत. पाणीपुरी विक्रेत्या आजीचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहता पाहता आजीकडे पाणीपुरी खायला येणाऱ्यांची गर्दी आता वाढू लागली आहे.
चंद्रभागा शिंदे या आजी केवळ पाणीपुरी किंवा भेळ देऊन थांबत नाहीत. त्यांनी तर आपल्या गाड्यावरील भेळ पाणीपुरी अधिक चवदार व्हावी, म्हणून त्याचा मसाला त्या स्वतः पाट्यावर तयार करतात, अशी माहिती त्यांच्या सूनेने दिली. उद्देश एवढाच की मालाचा जास्त खप झाला तर पैसे मिळतील आणि कर्ज लवकर फिटेल. अर्थातच आजीच्या हातची चव खवय्यांच्या पसंतीस उतरली नसेल तरच नवल.
पतीच्या निधनानंतर चंद्रभागा आजीच्या आतली बायको कधीच खचली होती. मात्र, त्यांच्यातली ‘आई’ अजूनही खंबीरपणे उभी आहे. ती नियतीशी झुंज देत आहे. आजीच्या लढ्यातून आपण शिकायला हवे, तेव्हा ही पाणीपुरी खायला नक्की जा आणि आजींच्या पंखालाही बळ द्या, असे आवाहन सोशल मीडियातून केले जात आहे.
या सोशल मीडियाच्या आवाहनाला वडगाव शेरी येथील काकासाहेब गलांडे यांनी शनिवारी आकुर्डी येथे आजींच्या पाणीपुरी गाडीवर जाऊन आजींना २५,०००/- हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच आजींना लवकरच मोठी हातगाडी माझ्या वाढदिवसानिमित्त दि.९ जानेवारीला देण्यात येऊन त्यांच्या संसाराला थोडाफार हातभार लावण्यात येईल.असे गलांडे यांनी सांगितले.