कारखानदार धार्जिणे प्रदूषण मंडळ

दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषणाच्या समस्या डोकं वर काढत असताना याची संपूर्ण जबाबदारी असणारे प्रदूषण मंडळ कारखानदारांचे हित जपण्यात धन्यता मनात आहेत. गेली अनेक वर्ष या परिसरातून रासायनीक सांडपाण्याचे नमुने गोळा केले जात आहेत. मात्र कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कारण समोर करून नेहमीच टाळाटाळ करण्याचे प्रकार वाढत आहेत. नुकतेच याची प्रचीती औद्योगिक क्षेत्रातील डी -३५ विश्वा लँबोरेटरी या कंपनीला सांडपाणी सोडण्याच्या प्रकारावरून पकडण्यात आले होते.
मात्र कारवाईसाठी विविध करणे समोर येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील रासायनीक प्रकल्पावर नियंत्रण करण्यासाठी प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी अधिकारी येत असतात. मात्र प्रदूषणाच्या समस्या पाहता तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आठवड्यातील सोमवार व गुरवार असे दोन दिवस पाहणीसाठी नेमुन दिले होते. मात्र अगदी काहीच दिवस हा उपक्रम सुरु करून परिस्थिती जैसे थे झाली आहे. कर्मचारी संख्येअभावी दोन दिवस शक्य नसल्याचे कारण पुढे येऊ लागले व नंतर तर जर तक्रार झाली तरच अधिकारी कुरकुंभच्या दिशेला रवाना होतात. अन्यथा फक्त फोनवरच कारभार सुरु आहे. त्यामुळे परिसरातील कारखानदार बेजबाबदारपणे मनमर्जी कारभार करीत आहेत.
कुरकुंभच्या समस्या निवारण्यासाठी अनेकवेळा विविध स्तरावरील बैठकीतून काहीच हाती लागत नसल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. सुरक्षेच्या दृष्ठीने उपलब्ध नसणाऱ्या सुविधा,अत्यंत घातक रसायनांचा बेकायदेशीर साठा, रासायनीक सांडपाण्याला प्रक्रिया न करताच उघड्यावर किंव्हा अन्यत्र सोडण्याचे वाढते प्रकार यामुळे समस्यांचा डोंगर वाढत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा