कार्ल मार्क्स…

आज या जगात अनेक प्रतिभावंत लेखक,राजकारणी, समाजकारणी, विद्वान लोक होऊन गेले, त्यांनी त्यांचे आचार-विचार या जगासमोर मांडले. काही विस्मृतीत गेले काहींचे चिरकाल टिकणारे राहिले, पण ज्यांचे चिरकाल टिकणारे राहिले तेही काही काळानंतर लोक विसरून गेले, पण इतिहासात काही लोक स्वतःच्या विचाराने आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करतात व ते कितीही वर्षाने पुसले जाऊ शकत नाही. त्यातील सर्वात अक्षय स्थान निर्माण करणारा विचारवंत, लेखक,पत्रकार,वक्ता जगातील कामगारांचा तारणहार कार्ल मार्क्स.

५ मे कार्ल मार्क्स यांचा जन्म दिवस, यांचा जन्म ५ मे १८१८ रोजी जर्मनीतील ट्रायर या गावी झाला. त्यांचे कुटुंब हे मध्यमवर्गीय होते. कार्ल मार्क्स हे त्यांच्या आई वडिलांचे ९ वे अपत्य होते,त्यातील कार्ल मार्क्स हे एकमेव जिवंत राहिले. कार्ल चे वडील हे त्या भागात वकिलीचा व्यवसाय करत. कार्ल हे धर्माने यहुदी होते. त्यांचे वयाच्या १२ वर्षापर्यंतचे शिक्षण हे घरातूनच झाले त्यानंतर त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी वडिलांच्या सांगण्याने बॉन विश्वविद्यालयात कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. त्याचबरोबर बर्लिन व जेना विश्वविद्यालयात प्रवेश घेऊन साहित्य व इतिहासाचाही अभ्यासक्रम पूर्ण केला.

महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती,बोलिअन राज्यक्रांती पोलंड चा उठाव इत्यादींचा ही सखोल अभ्यास केला, त्याच बरोबर कार्ल यांनी लोकशाही,भांडवलशाही,समाजवाद,इतिहास, आर्थिक व सामाजिक तत्वांचा सखोल अभ्यास केला, या त्यांच्या संशोधनासाठी जेना विद्यापीठाने त्यांना पहिली डॉक्टरेट पदवी प्रदान केली. तसेच बर्लिन विद्यापीठातूनही त्यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली होती. शिक्षण संपल्यानंतर १८४२ मध्ये कोलोन वरून प्रकाशित होणाऱ्या “राहुनिशी जितुंग ” मध्ये पत्रकारितेची सुरवात केली. काही काळानंतर ते त्याचे संपादकही झाले पण १५ महिन्यातच स्फोटक लिखाण करण्याच्या कारणावरून जर्मन सरकारने हे पत्रक तात्काळ बंद केले.

कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांना जेनी वोन्वेस्टकालीन नावाच्या मुलीचा परिचय झाला व त्यांनंतर त्यांनी तिच्याशीच पुढे विवाह केला. कार्ल मार्क्स यांचे लॅटिन व फ्रेंच भाषेवर प्रचंड प्रभुत्व होते,पण त्याचबरोबर रशियन, डच,इटालियन,स्पॅनिश,व इंग्रजी भाषेचाही अभ्यास होता.जेनी सोबत विवाह केल्यानंतर जून १८४३ मध्ये जर्मनीमध्ये राहणे त्यांना अशक्य झाले, कारण त्यांच्या लेख, भाषण या गोष्टींवर जर्मन सरकार बारकाईने लक्ष ठेऊन होते. काम करणे जर्मनीतून अशक्य असल्याने ते पॅरिस मध्ये स्थायिक झाले.तिथेच एका नियतकालिकेसाठी काम करत असताना मार्क्स ची ओळख “फेड्रिक एंगल्स ” यांच्याशी झाली,दोघांचीही वैचारिक बैठक असल्याने दोघे एकत्र काम करू लागले. पण कामगारांच्या भावना भडकावण्याच्या नावाखाली जर्मन सरकारच्या दबावामुळे कार्ल्स यांची पॅरिस मधून हकालपट्टी झाली.त्यानंतर ते “एंगल्स ” सोबत ब्रुसेल्स येथे स्थायिक झाले.

युरोप च्या कामगार वर्गामध्ये कार्ल मार्क्स यांच्या लिखाण,व्याख्यान यामुळे पूर्ण युरोप मध्ये कार्ल मार्क्स यांच्या रूपाने कामगारांना एक आशेचा किरण दिसत होता. त्यामुळे त्यांना पूर्ण युरोपभर व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात येत असत हे युरोपभर फिरत असताना त्यांना कामगारांची आर्थिक पिळवणूक त्यांच्या लक्षात आली, त्यांच्या “दास कॅपिटल” या जगप्रसिद्ध ग्रंथात त्यांनी त्याची मांडणी केली. समाजवादी वारसा सांगणाऱ्या लोकांसाठी कार्ल मार्क्स यांचा “दास कॅपिटल”हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारे त्यांची ज्ञानेश्वरीच आहे. कामगारांच्या भल्यासाठी काहीतरी निर्णायक करण्याची जाणीव आल्यानंतर त्यांचे सहकारी फेड्रिक एंगल्स सोबत समाजवादाचा प्रबंध लिहिला जो भांडवलशाहीला विरोध दर्शविणारा होता. त्या कारणाने फ्रान्स,जर्मन,बोलीअंन सरकारने त्यांची हकालपट्टी केली होती.

कार्ल मार्क्स यांना आजही काहींचा विरोध आहे तर काहीजण त्यांना पाठिंबा देतात. ज्या व्यक्तीने उभी हयात कामगारांना डोळ्यासमोर ठेऊन नेहमीच त्यांच्या हितासाठी लढण्यासाठी घालवली पण त्यांनी जे काम केले आहे ते कधीही दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण त्यावेळी त्यांनी जगातील “सर्व कामगारांनी एक व्हा” ही साद घातली होती, त्यावेळी त्यांनी सांगितले होते कि तुमच्याकडे गमाविण्यासाठी काहीच नाही तुमच्या साखळदंडाशिवाय.

अशा या प्रतिभावंत लेखक,पत्रकार,वक्ता,तत्वेत्ता ज्ञानी पुरुषाचा आज जन्मदिवस. जोपर्यंत या जगात भांडवलशाही ( मालक ) अस्तित्वात आहे तोपर्यंत आपणास कोणीही विसरू शकणार नाही…

– अशोक कांबळे.

error: Content is protected !!
Exit mobile version