इंदापूर, ४ जानेवारी २०२१: इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना चालु सन २०२०-२१ च्या गळीत हंगामामध्ये ऊस गाळपात राज्यामध्ये आघाडीवर आहे. राज्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या पहिल्या दहा साखर कारखान्यांमध्ये कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा समावेश झाला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने आज (दि.४ ) अखेर ५ लाख ५१ हजार ५०० मे.टन उसाचे गाळप पुर्ण करून राज्यात गाळपात आघाडी घेतली आहे. राज्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या पहिल्या दहा साखर कारखान्यांमध्ये कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा ६ वा क्रमांक आहे. सध्या कारखान्याकडून प्रतिदिनी सुमारे ९,००० मे.टना पर्यंत ऊसाचे गाळप केले जात आहे.
चालू हंगामात कारखान्याने १४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. प्रत्येक पंधरवड्याला ऊस बिलाचा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केला जात आहे. कारखान्याचे को- जन, डिस्टिलरी, बायोगॅस, सेंद्रीय खत आदी प्रकल्प उत्कृष्टरित्या चालु आहेत.
कर्मयोगी कारखान्याने ऊस गाळपात राज्यामध्ये आघाडी घेतल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी व वाहतूकदार यांचे प्रयत्नाने चालु हंगामात ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पुर्ण केले जाईल, असे कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे