दैव नर्तकांना कर्नाटक सरकार देणार मासिक वेतन, ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रभाव

43

बेंगळुरू, २२ ऑक्टोबर २०२२ : कर्नाटकातील ग्रामीण भागात साजरी केली जाणारी दैव नर्तक आणि भूत कोला ही एक प्रथा आहे. यामध्ये गावातील लोकांकडून देवांची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी गावातील व्यक्ती, देवाचा वेष परिधान करून नाचतात. नृत्य करणाऱ्या व्यक्तीला दैव नर्तक म्हटले जाते. भूत कोला या प्रथेत असे मानले जाते की, नृत्यादरम्यान देवता त्या व्यक्तीच्या आत प्रवेश करते आणि दैव नर्तक जे काही म्हणतील, ती गावकऱ्यांसाठी देवाची आज्ञा मानली जाते.

‘कांतारा’ चित्रपटाची कथा अशा लोकांपासून प्रेरित आहे जे देवाचे वेश धारण करून नर्तक बनतात. आता कर्नाटक सरकारने वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या दैव नर्तकांना मासिक वेतन देण्याची घोषणा केली आहे. सरकारने त्यांना २००० रुपयांपर्यंत भत्ता जाहीर केला आहे. बंगळुरुचे खासदार पीसी मोहन यांनी ट्वीट करत हा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, ‘ही एक पवित्र कला आहे आणि चित्रपटात दाखवलेली ‘भूत-कोला’ ही प्रथा ही हिंदू धर्माचा एक पवित्र भाग आहे,’ हे ट्वीट त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीलाही टॅग केले आहे.

‘कांतारा’ हा कन्नड चित्रपट देशभरात गाजतोय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. कन्नड इंडस्ट्रीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कांतारा ठरला. याच्यापुढे फक्त KGF पार्ट १ आणि KGF पार्ट २ आहे. चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही, तर सरकारवरही या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव पाहायला मिळत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे.