वैचारिक मेजवानीची कस्तुरी व्याख्यानमाला आजपासून अकोल्यात

अकोला, १७ ऑक्टोबर २०२२: यंदाची त्रिदिवसीय १० वी कस्तुरी व्याख्यानमाला आजपासून म्हणजेच १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान अकोला येथील प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित केली आहे.

कस्तुरी व्याख्यानमालेत आज सोमवारी पुणे येथील भक्ती देशमुख या ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर.. एक धगधगते अग्निकुंड’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफणार आहेत. मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील कवयित्री व साहित्यिक प्रा. विजया मारोतकर ह्या ‘कवेत अंबर घेतांना ‘ या तरुणाई ला स्पर्श करणाऱ्या विषयावर आपलें विचार मांडतील.

बुधवार १९ ऑक्टोबर रोजी पंढरपूर येथील वारकरी संत, कलावंत, हरी भक्त परायणकार चंदाताई तिवाडी व सहयोगी कलावंत यांचे ‘भारूड’ अनुभवण्याची पर्वणी अकोलेकरांना लाभणार आहे. चंदाताई या भारुडासाठी भारतात प्रसिद्ध आहेत. लोकांना भक्ती मार्गाकडे लावण्यासाठी हसत खेळत परमार्थ साधता यावा यादृष्टीने भारूडाची रचना केली. तोच वसा चंदाताई १९८२ सालापासून पुढे नेत आहेत. त्या विविध विषयांवर भारूड सादर करताना विनोद, अभिनय, नृत्यासहित भारूड श्रोत्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे दारू-गुटखा व्यसनमुक्ती, एडस्, कुटूंब नियोजन, पाणीप्रश्न, कृषी योजना, राष्ट्रीय एकात्मता, महिला स्वातंत्र्य, भ्रूणहत्या अशा अनेक विषयावर भारुडातून जनजागृतीचे कार्य सतत चालू असते.

या वैचारिक मेजवानीचा रसिकांनी आणि नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक, कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी आणि वै. सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण संस्था, आपातापा यांच्या कडून करण्यात आले आहे. दररोज संध्याकाळी ६ वाजता या व्याख्यानाची वेळ आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा