कथ्थकचा जनक हरपला …. बोल पोरके झाले

आज घुंगराचे थिरकणे थांबले, तबल्याचे बोल हवेत विरले आणि कथ्थक नृत्याच्या एका पर्वाचा अस्त झाला आणि कथ्थक नृत्याच्या त्या कलाकाराचा इहलोकीचा प्रवास सुरु झाला. स्वर्गलोकात रंभा , उर्वशी त्यांच्या स्वागताला , आदरातिथ्य करायला जातीने हजर होती. पद्मविभूषण कथ्थक नृत्य पारंगत पंडित बिरजू महाराज यांचा आज पृथ्वीवरच्या प्रवासाचा अखेर झाला. वयाच्या ८३ व्या वर्षी बिरजू महारांजांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

बिरजू महाराज यांचे मूळ नाव बृजमोहन मिश्र होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ मध्ये लखनौमध्ये झाला. त्यांचा कथ्थकच परिचय त्यांचे वडील प्रसिद्ध नर्तक अच्छन महाराज यांच्यामुळे झाला. कथ्थकच्या प्रसारासाठी आणि सेवेसाठी बिरजू महाराजांनी आजन्म वाहून घेतले होते. त्यासाठी त्यांनी कलाश्रम नावाची संस्था सुरु केली होती. केवळ भारतभर नाही तर जगभरात कथ्थकचे कार्यक्रम करुन वाहवा मिळवली, शिष्यगण मिळवले आणि कथ्थक केलेला आदराचे स्थान निर्माण करुन दिले.

बिरजू महाराजांना १९८६ साली पद्मविभूषण सन्मान, २००२ मध्ये लता मंगेशकर पुरस्कार, भरतमुनी पुरस्कार, २०१६मध्ये फिल्म फेअर पुरस्काराने नावाजण्यात आले होते .

भाव , राग आणि ताल यांचा उत्तम मेळ एखाद्या पुरुषात असणे , ही खूप कमी पहायला मिळणारी गोष्ट महाराजांमध्ये होती. अंगिक भाव ही त्यांची खासियत होती. असा हा कथ्थकचा बादशहा जाण्याने कथ्थक नृत्यकला पोरकी झाली. अशा या कथ्थकचा जनक असलेल्या पंडित बिरजू महाराजांना न्यूज अनकटची श्रद्धांजली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा