कवचकुंडलं

मला भेटली फुटपाथवरच… भिक मागत…! वय वर्षे 70 च्या आसपास… दिसायला काळीसावळी आणि अंगावर अक्षरशः अर्धा इंचाची घाण…
तीन फुटांच्या अंतरावर गेलो तरी विचित्र, अतिशय घाणेरडा एक वास येतो…
अंगावर नाही म्हणायला एक मळकी साडी… (मळकी हा शब्द खुप थीटा आहे)
याला साडी का म्हणावं ? हाच मुळात प्रश्न आहे… अक्षरशः पाच साडेपाच फुटाचं हे कापड ती अंगावर गुंडाळते… जे झाकायला जावं तेच उघडं पडतं… आणि दुर्दैव असं की तीला ते कळत नाही… जाणवत नाही… कारण डोळ्याच्या कसल्याशा प्रोब्लेममुळे तीला काही दिसतच नाही…!
एकुण अवस्था अशी, की या आज्जीजवळ कुणी जावुच नये… तीच्याजवळ कुणी बसुच नये…! तरीही मी जातो, बसतो तीच्याजवळ .. याचं कारण तीचं लाघवी बोलणं…
हिच्या गोबऱ्या गालातुन एक एक शब्द असा बाहेर पडतो, जसा शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या अभिषेकपात्रातुन थेंब थेंब अभिषेक व्हावा, त्या पिंडीवर …! अतिशय शुद्ध आणि सात्त्विक !
भिक मागतांना म्हणते… “बाळा तुला जमलं काही तर मला दे, स्वतःला अडचणीत टाकुन मला काही देवु नकोस… आधी तु घे, प्रसन्न हो, त्यातुन काही उरलं आणि तुला जर मला द्यावंसं वाटलं तरच दे… अन्यथा नको !”
गोळ्या मागतांना म्हणते, “डॉक्टरसाहेब , मला देणं शक्य असेल तरच गोळ्या द्या. अहो माझ्यापेक्षा जास्त त्रास असणारे खुप आहेत अजुन, त्यांना आधी द्या… मी काय, करेन थोडं सहन… !”
दुस-याचा विचार करण्याच्या तीच्या या वृत्तीमुळे मी हिच्याकडं आपसुकच ओढला गेलो होतो…
तीच्याजवळ बसलं की, तीचं बोलणं ऐकता ऐकता बोलण्यातुनच सुगंध इतका घमघमायला लागतो की अंगावरुन येणाऱ्या घाण वासाची जाणिवच होत नाही आपल्याला…
शेजारी बसलं की विचारते, “मी एक श्लोक म्हणु… ?” आणि आपल्या उत्तराची वाट न पाहता, ही “विश्वप्रार्थना” म्हणायला सुरुवात करते… “सर्वांना चांगली बुद्धी दे… आरोग्य दे…..आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे…!”
या विश्वात ज्याच्याकडे सर्व काही आहे, तो स्वतःला अजुन काही तरी मिळुदे म्हणुन “लाचार” होतोय… आणि सर्वस्व गमावुन बसलेली ही आज्जी ‘दुसऱ्याला सुखात ठेव’ म्हणुन “प्रार्थना” करत्येय…!
स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी, आणि दुस-यासाठी मागणं ही झाली प्रार्थना… दोन्हीतला फरक मला या आज्जीमुळेच समजला…!

ही आज्जी, एका मॕनेजर ची बायको. भरपुर श्रीमंती आणि खानदानी संस्कार. रास्तापेठेत यांचा जुना बंगला होता. सगळं काही होतं, पण घरात कुणी चिमुकलं नव्हतं. दोन वेळा पोटातच बाळ गेलं. मरता मरता वाचली. तिसऱ्या वेळी डॉक्टरांनी सांगितलं, “आता तुम्हाला बाळ होणे नाही. दत्तक घ्या.”
मधल्या काळात यजमान गेले. इतके दिवस “दुर” असलेले सगळे नातेवाईक “जवळ” आले. आठवतील ती नाती सांगुन घराची वीट न् वीट घेवुन गेले.
सगळी “नाती” बरोबर येताना “पोती” घेवुन आली होती. या पोत्यांतुन सर्वस्व वाहुन नेलं हिचं… हिच्याच डोळ्यांदेखत…
असलेली सगळी “नाती” हिंदकाळत “गोती” खात गेली, आणि वाड्याची ही खानदानी मालकिण आता फुटपाथची राणी म्हणुन जगत्येय, गेली 15 वर्षे… विश्वप्रार्थना गात… ‘सर्वांना सुखी ठेव’ म्हणत…! आपल्या अंगावर धड कापड नसतांनाही गात असते… ‘सर्वांना ऐश्वर्यात ठेव…!’ सगळ्यांनी लुबाडुन घेतलं तरी आर्त प्रार्थना करते…. ‘सर्वांचं भलं कर…कल्याण कर….’
ऐकणारा “तो” तीचं ऐकतोय की नाही माहित नाही… तरीही गोबऱ्या गालांतुन हसत, वर बघत विश्वासानं म्हणत असते ‘आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे…!’
मी एकदा चाचरत हिला म्हटलं, “मावशी तु मनानं इतकी सुंदर आहेस पण इतकी अस्वच्छ का राहतेस?”
ती म्हटली, “अस्वच्छ …? मी कुठंय अस्वच्छ …???”
“अगं हा वास…?” मी आवंढा गिळत, नजर चोरत बोललो….
ती म्हटली, “हा वास घाणेरडा वाटतो का रे बाळा तुला ? लहान आहेस तु बाळा अजुन…. अरे रस्त्यावर या घाणेरड्या वासानंच माझ्या, रक्षण केलंय माझं… !” ती हसत बोलली…!!!
“म्हणजे…?”
कानाजवळ येवुन बोलली, “तुला माहीत आहे ? कापुर पेटवला की आजु बाजुला किडे येत नाहीत… मच्छरची अगरबत्ती पेटवली की मच्छर आसपास येवुन चावत नाहीत…
ही घाण नाही बाळा, हे माझं कापुर आहे… माझी अगरबत्ती आहे… या कापरामुळंच आणि अगरबत्ती मुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वाऱ्यालाही येत नाहीत…”
बापरे… मी हा विचार ऐकुन हादरलो…. केवळ शील जपण्यासाठी जाणुन बुजुन ही घाणीत राहते…
आपण कुठल्या समाजात राहतो ? स्वतःला जपण्यासाठी इथं स्वतःला आधी घाणीत लोळवावं लागतं… दुर्गंधाला आपलं कवचकुंडल बनवावं लागतं…
या आज्जीनं नवऱ्यामागं स्वतःला जपण्यासाठी अंगावर घाण चढवुन घेतली होती. मुद्दाम दुर्गंधीत झाली होती. गंमत पहा कशी, एका घाणीनं आणि दुर्गंधानं कुणाचं तरी पावित्र्य जपलं होतं.. काटे बोचतात, पण फुलाला जपतात तसं…
मी मनोमन या माऊलीला नमस्कार केला. आता अंगावरची तीच्या एक इंचाची घाण म्हणजे तीनं अंगावर चोपडुन घेतलेलं पवित्र भस्म आहे असं मला वाटायला लागलं, आणि तीच्यातुन येणारा दुर्गंध म्हणजे सुगंधी कापराचा वास…!!!

या आजीला मी डोळ्याच्या ऑपरेशन साठी घेवुन आलो 27 तारखेला. अंगावर तीच अर्धीमुर्धी साडी आणि तोच वास…!
दवाखान्यात बसलेल्या इतर सगळ्यांनीच हिला पाहुन नाक मुरडलं. नाकाला पदर लावले. कुणी कुणी चक्क उठुन निघुन गेले. बरोबरच आहे, चिखलात फुललेलं हे कमळ आहे, याची कुणालाच जाण नव्हती… इतरांसाठी हा वास होता… आणि माझ्यासाठी सुगंध…

संदर्भ कसे झटक्यात बदलतात ना ? बाळाच्या शी शु चा “आईला” कधीच “वास” येत नाही… दुर्गंधीत असुनही….
जवळचं कुणी माणुस गेल्यावर, पार्थिवाशेजारी ठेवलेल्या अगरबत्तीचा वास ही नकोसा वाटतो मग… सुगंधीत असुनही….!
वास आणि सुगंध आपल्या मनाच्या कल्पना आहेत. समोरच्याविषयी आपली भावना महत्वाची. चांगली भावना असेल तर सुगंधच सुगंध नाहीतर फक्त घाणेरडा वास…!!!

मी आज्जीच्या अर्ध्या घातलेल्या साडीकडं पाहीलं आणि मुक नजरेनं आमच्या भुवड ताईकडं पाहिलं…
भुवड ताईने त्याच मुक्या नजरेनं भुवड बाबांकडं पाहिलं. कुणीच कुणाशी काही बोललं नाही.
बाबा उठले आणि झटक्यात बाहेर गेले. बरोबर 20 मिनिटांनी परत आले. हातात दोन साड्या, एक गाउन, मोती साबण, अंग घासण्याची घासणी आणि टॉवेल …!
मला हेच सांगायचं होतं भुवड ताईंना. न बोलताही त्यांना कळलं. मुक्या नजराही किती बोलक्या असतात ना काहीवेळा …?
भुवड ताईंनी मग, या माऊलीला दवाखान्यातल्याच बाथरुम मध्ये नेलं. बाळाला चोळुन घालावी तशी पावणे दोन तास आंघोळ घातली…
भुवड ताई या वेळी मला एका लेकराची माय वाटली. कुठल्याही वासाची लागण न झालेली…! जे आहे ते सारं सुगंधीच आहे असं समजुन तो सुगंध अनुभवणारी…. आणि ती आज्जी झाली होती एक छोटं निरागस बाळ…
बाथरुम मधुन दोघी बाहेर आल्या तेव्हा सगळ्यात जास्त सुगंध आला माझ्या भुवड ताईच्या हाताचा. जगातले सर्वात सुंदर हात होते ते, आणि तितकेच सुगंधी….! शुचिर्भुत झालेल्या आजीचं नवं रुप पाहुन मी स्तिमित झालो…

आजीचं 27 तारखेलाच डोळ्याचं ऑपरेशन करुन घेतलं. आता तीला दिसायला लागेल !
ऑपरेशन नंतर,मी तीचे हात हातात घेवुन म्हटलं, “आज्जी, तुझ्या अंगावरचं “भस्म” आणि “कापराचा वास” आज आम्ही काढुन टाकलाय. तुझी ही कवचकुंडलं काढुन घेतली आहेत, पण काळजी करु नकोस. तुला आजपासुन अशा कवचकुंडलांची गरज पडणार नाही….”
“म्हणजे?” आज्जी बोलली….
मी म्हटलं…. “आता जीथं तुला सन्मानानं सांभाळतील अशा ठिकाणी मी तुझी व्यवस्था करणार आहे. इथुन पुढं तु गटारीत घाणीत फुटपाथवर राहणार नाहीस. मी ठेवेन तुला चांगल्या ठिकाणी ….!”
“पण तु हे का करतोयस माझ्यासाठी ?” तीनं निरागस पणे विचारलं….
“मी ही तितक्याच निरागसतेनं सांगीतलं, “तु मला सांगीतलं होतंस ना ? तुझं बाळ दोनवेळा पोटातच गेलं…. अगं ते गेलं नव्हतंच कधी…. डॉक्टरांनी खोटंच सांगितलं होतं तुला… मी तेच बाळ आहे तुझं….!! फिरुनी पुन्हा जन्मलो मी….!!!”
तीचे डोळे डबडबले…. माझ्या गालावरुन हात फिरवत, ती प्रसन्न हसली… म्हणाली “श्लोक म्हणु…?” नेहमीसारखीच उत्तराची अपेक्षा न ठेवता तीनं डोळे मिटले. माझे हात हाती घेतले. ते हात तसेच हातात ठेवुन तीने स्वतःचेही हात जोडले… आणि विश्वप्रार्थना सुरु केली…. माझे हात हाती घेवुन…. “सर्वांना चांगली बुद्धी दे…सर्वांचं भलं कर, सर्वांना आनंदात ऐश्वर्यात, सुखात ठेव, कल्याण कर, रक्षण कर… आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे….!”
मी तीच्याकडं एकटक पाहत होतो. स्वतः जळत राहुन दुसऱ्याला सुगंध देणारी ती एक सुवासिक अगरबत्ती आहे असा मला त्यावेळी भास झाला….!!!

आणि सारा आसमंत चक्कं सुगंधी झाला…..!!!

लेखक- डाॅ. अभिजीत सोनवणे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा