केदारनाथ मंदिर २५ एप्रिल पासून भाविकांसाठी खुले

केदारनाथ, ५ एप्रिल २०२३: केदारनाथ मंदिर २५ एप्रिल पासून सर्व भाविकांसाठी खुले होणार आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आज सकाळी माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितले की, भाविक केदारनाथ धामला चालत आणि हेलिकॉप्टरने जाऊ शकतील. राज्याच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅड टुरिझम कॉर्पोरेशनला हेलिकॉप्टरने केदारनाथ धामला जाणाऱ्या यात्रेकरुंच्या सोयीसाठी ऑनलाईन बुकिंग अधिकृत करण्यात आले आहे.

उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेच्या माहितीनुसार यंदा चारधाम यात्रेसाठी ६.३४ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी केदारनाथ धामसाठी २.४१ लाख आणि बद्रीनाथ धामसाठी २.०१ लाख, यमनोत्री धामसाठी ९५.१०७ आणि गंगोत्री धामसाठी ९६.४४९ भाविकांची नोंदणी झाली आहे. उत्तराखंडमधील चारधाम यात्रा ही भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्रापैकी एक आहे.

हे तीर्थक्षेत्र हिमालयात उंचावर वसलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार पवित्र स्थळांची यात्रा आहे. उंचावरील ही मंदिरे दरवर्षी सुमारे सहा महिने बंद राहतात. उन्हाळ्यात एप्रिल किंवा मे महिन्यात उघडतात. आणि हिवाळा सुरू झाल्यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात बंद होतात. २२ एप्रिलला यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरे उघडून चारधाम यात्रा सुरू होईल. केदारनाथ २५ एप्रिल आणि बद्रीनाथ २७ एप्रिलला उघडणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा