पुणे, ६ ऑगस्ट २०२०: खडकवासला धरण परिसरातील पावसाचा जोर कायम असल्याने आज( गुरुवारी) दुपारपर्यंत खडकवासला धरण भरणार आहे. तसेच आधी कालव्यातून विसर्ग सुरु केला जाणार आहे.
तर आवक वाढतच राहिली तर नदीपात्रातूनही विसर्ग केला जाऊ शकतो. या सर्व घडामोडींवर महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बारकाईने लक्ष ठेऊन आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
खडकवासला धरणात सध्या ६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज( गुरुवारी) दुपारनंतर खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.
याबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून चांगला पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणात बुधवारी( दि.५) रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा होता. या धरणाची क्षमता १.९७ टीएमसी इतकी आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सूरू आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ मिलिमीटर, पानशेत ५४ मिमी, वरसगाव ५५ मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दिवसभरात धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
त्यामुळे आज दुपारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले तर खडवासला धरणातून सोडला जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे