वेल्हे, पुणे २४ जून २०२३: पुणे शहर व जिल्ह्यातील जवळपास एक कोटी रहिवाशांना तसेच ६० हजारांहून अधिक हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणारी, खडकवासला धरणसाखळी पाणी साठविण्यासाठी सज्ज झाली आहे. पानशेत, वरसगाव व खडकवासला या धरणांच्या पावसाळी देखभाल दुरुस्तीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. जून महिना संपत आला तरी धरणक्षेत्रात पाऊस पडला नसल्यामुळे अदयाप पाणीसाठ्यात भर पडली नाही.
पूर्णक्षमतेने धरणात पाणीसाठा व्हावा तसेच विना अडथळा सांडव्यातून पाणी सोडता यावे, यासाठी धरणांच्या मुख्य भितींतील सर्व भागांची सफाई करुन रंगरंगोटी, गेटला ग्रीसिंग आणि ऑयलिंग आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. धरणांच्या सांडव्याचे दरवाजे, तसेच टॉप लेनला ही डागडुजी केली जातेय.
दरम्यान शेतीचे पाणी बंद करण्यात आले असले तरी पिण्यासाठी पुरेसे पाणी सोडले जात असल्याने, तसेच धरणक्षेत्रात कडकडीत उन्हाळा सुरू असल्याने खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात वेगाने घट सुरू आहे. धरणसाखळीत ४.२६ टीएमसी म्हणजे १४.६५ टक्के इतकेच पाणी शिल्लक होते.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर