पुणे, दिनांक १६ सप्टेंबर २०२२ : पुणे शहराला वर्षभर पाणीपुरवठा करणारी आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील बारामती, इंदापूर, दौंड या भागाला शेतीच्या पाण्यासाठी उपयोगात येणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. नागरिकांना सुरक्षिततेसाठी पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसापासून धरण क्षेत्रामध्ये संतधार आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आज (१६ सप्टेंबर) खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने १००% भरली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी. असे आवाहन खडकवासला पानशेत आणि वरसगाव धरण क्षेत्राचे सहाय्यक अभियंता यो.स.भंडलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
पुढील ३ ते ४ तासांमध्ये खडकवासला धरणा मधून मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे २२,००० ते २५,००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये. त्याचबरोबर नदीपात्रात काही वस्तू अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील नागरिकांनीही सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर