मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर मंगळवारी गंभीर आरोप केले होते. यानंतर पहिल्यांदाच फडणवीस आणि खडसे यांच्यात जळगाव येथे बैठक झाली. या बैठकीतील चर्चेवर खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझी आणि फडणवीस यांची बैठक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंबंधी होती. त्यामुळे या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नसल्याचं खडसे यांनी सांगितलं आहे. नाराजीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि महाजन यांनी माझं तिकीट कापलं असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. या गंभीर आरोपानंतर खडसे आणि फडणवीसांची पहिल्यांदाच भेट होत होती. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
पक्षाने वारंवार डावलल्याची भावना खडसे यांच्या मनात आहे. त्यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे पक्षविरोधात कार्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.