भाजपच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीला खडसे उपस्थित राहणार…?

मुंबई, ७ ऑक्टोंबर २०२०: भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त प्रदेश कार्यसमितीची पहिली बैठक गुरुवार ८ ऑक्टोबरला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून,  राज्यभरातील पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत. परंतु भाजपच्या या कार्यकारिणीच्या बैठकीला एकनाथ खडसे उपस्थित असणार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसेंमध्ये भाजप पक्षाविषयी नाराजही बघायला मिळत आहे. तसंच असंही म्हटलं जात होतं की एकनाथ खडसे भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत.

तथापि, सोमय्या यांनी असा दावा केला आहे की, भाजपच्या कार्यकारणी बैठकीला एकनाथ खडसे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण, भाजपाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात कुठेही खडसेंचा उल्लेख नाही. तसेच एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळं खडसे नेमकी उद्या काय भूमिका घेतात, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव मांडण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, पीयूष गोयल हेसुद्धा दिल्लीतून या बैठकीत सहभागी होणार आहेत. विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर, विजया रहाटकर या नवनियुक्त सदस्यांचं स्वागत केलं जाईल, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा