नाशिक, १८ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र व गुजरातच्या सीमावर्ती भागात साग, खैर या वृक्षांसह वन्यजीवांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. आज पहाटे उंबरठाण वनपरिक्षेत्रात अवैध मार्गाने होणारी खैर प्रजातीच्या लाकडाची वाहतूक रोखण्यात वनविभागाला यश आले आहे. या कारवाईत वनविभागाच्या पथकाने तब्बल सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उंबरठाण वनपरिक्षेत्रातील गोंदुणे बीटच्या कक्ष क्रमांक पाच राखीव वनक्षेत्रातून अवैधरीत्या खैर प्रजातीच्या वृक्षांची तोड करून वाहतूक होणार असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. उंबरठाण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसह परिमंडळ हडकाईचौंडमध्ये गस्त करीत असताना पहाटेच्या सुमारास नियतक्षेत्र गोंदुणे राखीव वनकक्ष क्रमांक पाचच्या नाल्यालगत महिंद्रा मॅक्स पिकअपमध्ये (जीजी- ०५, वायवाय- ००२५) १५ ते १६ संशयित खैर प्रजातीच्या झाडांची तोड करून नेत होते.
वनकर्मचारी येत असल्याची चाहूल लागताच संशायितांनी जंगलात पोबारा केला. वनपथकाने संशायितांचा पाठलाग केला; मात्र संशयित तस्कर पळून जाण्यात यशस्वी ठरले. १०/०.६५४ घनमीटर खैर लाकडाचे नग आणि पिकअप असा ४ लाख २४ हजार ६९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर