खरीप हंगाम तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा

मुंबई, दि. ९ जून २०२०: खरीप हंगाम कामांसह बी-बियाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता, पिक कर्ज वाटप, तसेच कापूस, तूर व धान खरेदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. या बैठकीत कृषि मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता आदी सहभागी झाले होते.

खरीप हंगामामध्ये बी-बियाण्यांचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाणाच्या प्रकारात कडक शिक्षा करण्यात यावी. शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून लवकरात लवकर कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा असे आदेश यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

खते, बी-बियाणे बांधावर पुरविण्यासाठी ४७ हजार ८९ शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आत्तापर्यंत १ लाख ५५ हजार ७५५ मेट्रिक टन खत, ८६ हजार १२६ मेट्रिक टन बियाणे, १ लाख ८० हजार ४८१ कापूस बियाणे पाकिटे बांधावर पोहोचविली आहेत. याचा एकूण ५ लाख २७ हजार ४८३ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

एकंदर ३८१ लक्ष क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे, तर ९ लाख क्विंटल खरेदी बाकी आहे. तसेच २ लाख शेतकऱ्यांकडून १८.८१ लाख क्विंटल तूर खरेदी केली गेली आहे. ८२२ कोटी रुपयांचे चुकारे उपलब्ध आहेत. १८.९० लाख क्विंटल चणा खरेदी, यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ मागितली. याचेही चुकारे लवकरच देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून ६२५० कोटी (४६ टक्के), तर राष्ट्रीयकृत बँकांकडून २३०० कोटी (७ टक्के) पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी ४३.५० लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली आहे, त्यापैकी ४० लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी केंद्राकडून मिळाली आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड येथे ४६५० हेक्टर जमीन आणि १८ हजार हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा