खेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे “आवाज”

कुरुळी : ग्रामपंचायतींचे वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने गावोगावी राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत.
खेड तालुक्यातील तब्बल ९१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै अखेरपर्यंत संपत आहे.  त्यामुळे सर्वत्र निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.
फडणवीस सरकारने जुलै २०१७  मध्ये थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होती. परंतु महाविकासआघाडी सरकारने २८ जानेवारीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच निवड रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानाद्वारे सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा सरपंच पदासाठी निवडणूक लागणार असल्याने चुरस वाढली आहे.
खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील कुरुळी,मोई,चिंबळी आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर काही पॅनल प्रमुखांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांना घेऊन पर्यटनही घडून आणले आहे.
महत्वाच्या गावांच्या यात्रा -जत्रा आहेत. त्या गावांमध्ये आवर्जून पॅनल प्रमुख जेवणाचे आमंत्रण देत आहेत. पॅनलप्रमुख आपले विरोधक कुठल्या वाडीत, कुठल्या गावात गेले आणि कुठे प्रवास करत आहे, याच्यावर लक्ष ठेवू लागले आहेत. एकमेकांच्या कामाबद्दलच्या वाभाडे काढण्यात आता ही मंडळी लागली आहेत.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची निवडणूक जुलै महिन्यामध्ये होत आहे. ग्रामपंचायतीचा कारभार ताब्यात घेण्याची मनीषा असलेल्या गाव कारभार करणाऱ्या पॅनल प्रमुखांची भावी सदस्य शोधण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यातच गावांमधून प्रभागनिहाय आरक्षणही जवळपास निश्‍चित झाले आहे.
हरकतीची तांत्रिक बाब वगळता वॉर्डनिहाय आरक्षणामध्ये फारसे बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने आरक्षणामध्ये सुमारे ५० टक्‍के महिला तसेच खुला वर्ग इतर मागावर्गीय समाजातील सदस्य व अनुसूचित जाती जमातीतील सदस्य असल्याने या सर्व वर्गामधून आपल्याला दमदार सदस्य कसे मिळतील, या शोध आता पॅनल प्रमुखांनी सुरू केला आहे.
याशिवाय विरोधकांना शह देण्याचे मनसुबे आखले जात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने डावपेज आखण्यास सुरुवात केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा