किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा

                                                            कल्याणगड

“पुणे – बंगळूर महामार्गावर सातारा शहर वसलेले आहे. सातारा शहराच्या पूर्वेला सह्याद्रीमधील महादेव रांगेचे एक शृंग आलेले आहे. या शृंगातच नांदगिरी ऊर्फ कल्याणगड उभारलेला असल्याचे पहायला मिळते. पुणे – सातारा या महामार्गाच्या पूर्वेला कल्याणगड हा किल्ला आहे. सपाट माथा असलेल्या या किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या एकमेव वटवृक्षामुळे हा किल्ला दूरूनही ओळखू येतो.”

सातारा येथे ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली आहे. किल्ला इ.स.११७८ ते १२०९ या कालावधीत बांधला गेला असावा.शिलहाराच्या सापडलेल्या अनेक ताम्रपटवरून असे दर्शविते की, शिलाहार राजाने जैन लोकांना अनेक दान धर्मे केली. तसेच कल्याणगडावरील गुहेत असणाऱ्या पार्श्वनाथाच्या मूर्तीवरून हा गड शिलाहारानी बांधला असावा.असे सिद्ध होते. १६७३मध्ये शिवाजी महाराजांनी सातारा व आजूबाजूचा परिसर जिंकून घेतला. त्यावेळी कल्यानगडाचा त्यात समावेश होता.

कल्याणगडाचे एक वेगळेपण इथे दडलेले आहे. दरवाजातून आत शिरताच समोर कातळकडा आहे. या कातळकड्याच्या डावीकडे खाली काही पायर्‍या उतरल्यावर एक गुहा आहे. या गुहेत शिरण्या अगोदर काही काळजी घेणे आवश्यक आहे. या कड्यातील गुहेचे जे तोंड आहे. गुहेमध्ये पूर्णपणे अंधार आहे. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच आत शिरावे लागते. गुहेमध्ये पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पहिले दहा पंधरा फूट गुहेची उंची कमी असल्यामुळे वाकून जावे लागते. पुढे उंची वाढल्यामुळे उभे राहून जाता येते.
सध्या गुहेतील वाट बांधून काढण्याचे काम गावकर्‍यांनी सुरू केलेले आहे. ते पूर्णही होत आले आहे.
तीस पस्तीस फूट आत गेल्यावर नवव्या शतकातील एक पार्श्वनाथाची मूर्ती आहे. बाजूलाच दत्ताचे छोटेखानी मंदिर आहे. शेजारीच सध्या देवी मूर्तीही विराजमान झालेली आहे. हा सगळा भाग अंधार असल्यामुळे टॉर्चच्या उजेडातच पहावा लागतो. हे पाहून गोंगाट न करताच गुहेपासून दूर जावे लागते. पुन्हा दरवाजाच्याकडे येवून येथून वरच्या दरवाजाकडे जाणारी वाट पकडावी लागते.
वरचा दरवाजा पूर्वाभिमुख असून दोन्हीकडून बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. या दरवाजाच्या आत गेल्यावर समोर हनुमानाचे मंदिर आहे. शिखरावर गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. मंदिराच्या डावीकडे कड्यावर एक गोलाकार पर्णकुटी उभारून सध्या एका महाराजांनी मठ स्थापन केलेला आहे.

कल्याणगडाचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. माथ्यावरील एका वास्तूचे नूतनीकरण करून भक्त मंडळीसाठी निवासस्थान उभारलेले आहे. या वास्तूसमोरच एक समाधी असून बाजूला पाण्याचे मोठे तळे आहे. पाण्याचा उपसा नसल्यामुळे पाणी शेवाळलेले आहे. माथ्यावर वाड्याची व शिबंदीच्या घरट्यांची जोती आहेत. मध्यभागी वडाचे मोठे झाड आहे.
झाडाखाली कबर आहे. दक्षिण टोकावर कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. या टोकावरून समोरच जरंडेश्वराचा डोंगर दिसतो. संपूर्ण गड पाहण्यात तासभर पुरतो. कल्याणगडावरील वैशिष्ट्यपूर्ण असे जलमंदिर मात्र स्मृतिपटलावर कायमचे कोरले जाण्यासारखे आहे.

                                                                                                           -प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा