किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा

सज्जनगड

“प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य असल्याचे अभ्यासक सांगतात. त्यामुळे या किल्ल्याला “आश्वलायनगड”म्हणून ओळखले जाऊ लागले. या किल्ल्याची निर्मिती राजा भो याने ११व्या शतकात केली. २एप्रिल १६७३मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी या गडावर कायमचे वास्तव्यास आले होते.त्यानंतर या किल्ल्याचे नाव सज्जनगड पडले.”

सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. आश्वलायन ऋषींचे वास्तव्य होते. येथे अस्वलांचे वास्तव्य म्हणून अस्वलगड, नवरसतारा अशी आणखी नावे या किल्ल्याला लाभली आहेत. १८ जानेवारी १६८२रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

२२ जानेवारी १६८२मध्ये समर्थ रामदास स्वामींनी देह ठेवला. २१एप्रिल १७०० मध्ये फत्तेउल्लहखानाने सज्जनगडास वेढा घातला होता. ६जून १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला.व त्याचे ‘नवरससातारा’ असे या किल्ल्याचे नामकरण झाले. त्यानंतर १७०९मध्ये मराठ्यांनी पुन्हा तो किल्ला जिंकला. पुन्हा १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती गेला.

समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३०००फूट उंच आहे .तर पठारापासून १०००फूट उंचीवर आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या १०किमी अंतरावर हा गड उभा आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक रांग शंभूमहादेव नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड हा किल्ला वसलेला असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

या गडावर पर्यटकांची बाराही महिने गर्दी असते. राज्यभरातून या किल्ल्याला भेट देण्यासाठी अभ्यासक, पर्यटक येत असतात. शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची यशोगाथा या किल्ल्याकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येते. तसेच या किल्ल्यावर जाण्यासाठी शेजारी असणाऱ्या परळी गावामधील दरवाज्यातून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. अनेक स्थानिक नागरिक या मार्गाचाच वापर करतात.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा