किल्ल्यांनी जपला..ऐतिहासिक वारसा

मल्हारगड

“महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून “मल्हारगड” प्रसिद्ध आहे. पुणे जिल्हयाच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या पर्वत रांगेचे दोन भाग होतात.त्यात एका रांगेत राजगड आणि दुसऱ्या रांगेत तोरणा. दुसरी पर्वतरांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या रांगेला भुलेश्वर रांग असेही म्हटले जाते.”

किल्ल्यांच्या रचनेप्रमाणे पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे सर्व किल्ले एकाच रांगेत असल्याचे पहायला मिळते. पुण्यकडून सासवडला जाताना दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली आहे. असे अभ्यासकांचे मत आहे. या किल्ल्याची निर्मिती इ.स.१७५७ ते १७६० या कालावधीतील आहे. या किल्ल्याच्या अगदी जवळ सोनोरी नावाचे गाव आहे. त्यामुळे या गडाला “सोनोरी” असे म्हटले जाते.

मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असल्याचे पहायला मिळते. त्याच्या आतील बाजूस बालेकिल्ल्याला चौकोनी तट आहे. तसा पहायला गेले तर मल्हारगड आकाराने लहान आहे. दिवे घाटाकडे येणारी माणसं कोण आहेत. कुणी शत्रू तर नाही ना किंवा दिवेघाटातुन कुणी शत्रू तर येत नाही ना? यावर पाळत ठेवण्यासाठी मल्हारगडाची खरी निर्मिती करण्यात आली आहे. असे अभ्यासकांकडून सांगण्यात येते.

या किल्ल्यांची निर्मिती त्या काळी जे पेशव्यांचे सरदार होते पानसे यांनी केलेली आहे. पानसे हे पेशव्यांच्या तोफखाण्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे या मल्हारगडावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. तसेच पानसे यांचा सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे.

तसेच मल्हारगडावरून जेजुरीगड, कऱ्हा नदी, कडेपठार दिसते असे पर्यटकांकडून सांगण्यात येते. मल्हारगड हा दिवे घाटाच्या जवळपास असल्याने पर्यटकांच्या दृष्टीने पर्यटन स्थळ प्रसिद्ध होऊ लागला आहे.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा