किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा

अजिंक्यतारा

“सातारचा अजिंक्यतारा किल्ला म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड, मग रायगड, तिसरी जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. हा किल्ला शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने १११९ मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहमनी सत्तेकडे नंतर विसपूरच्या निजमशाहकडे गेला. १५८० मध्ये या किल्ल्यावर पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबीवी कैद होती. २७जुलै १६७३मध्ये शिवाजी राजांच्या कार्याचा विस्तार होत असताना हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला.”

अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यातील आणि गावातील किल्ला आहे. याची उंची साधारणतः ३००मीटर इतकी आहे तर त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६००मीटर आहे. प्रतापगडापासून निघणाऱ्या बामणोली रांगेमध्ये अजिंक्यतारा वसलेला आहे.

शिवाजी महाराज आजारी असतांना म्हणजे त्यांना अंगावर ज्वर आल्याने त्यांनी दोन महिने या किल्ल्यावर विश्रांती घेतली होती. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. त्यानंतर काही दिवसातच साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यावर प्रयागजी प्रभू होते. त्यावेळी अजिंक्यतारा जिंकण्यासाठी मोगलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन मोठी भुयारे खोदली. आणि इशारा देताच काही क्षणात मंगळाइचा बुरुंज आकाशात भिरकावला गेला.

त्यात तटावरील काही मराठे यात मारले गेले.त्यानंतर लगेचच दुसरा स्फोट झाला. त्यातील दगडांचा मोठा भाग मोलगलांच्या सैन्यावर ढासळला गेला. त्यात मोगलांचे दीड हजार सैन्य मारले गेले. त्यावेळी किल्ल्यावरील सर्व दारुगोळा संपला होता. त्यानंतर २१एप्रिलला सुभानजीने किल्ला जिंकून घेतला.

मराठ्यांच्या कडव्या झुंजीपुढे मोगलांना किल्ल्यावर मोगली निशाण फडकवण्यास तब्बल साडेचार महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर किल्ल्याचे नामकरण आजमतारा असे करण्यात आले. त्यानंतर ताराराणीच्या सैन्यांनी किल्ला पुन्हा जिंकला. त्यानंतर पुन्हा त्याचे नाव अजिंक्यतारा असे ठेवण्यात आले. अशी इतिहासात नोंद असल्याचे पहायला मिळते. त्यानंतर काही दिवसातच मोगलांनी हल्ला करून किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.

मात्र १७०८मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वतःचा अभिषेक करून घेतला. पुढे हा किल्ला पेशव्यांकडे गेला. त्यानंतर आपल्या अंतर्गत राजकारणामुळे किल्ला आणि दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. या अजिंक्यतारा किल्ल्यामुळे महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याची ओळख आहे.सातारा जिल्हयात शिवाजी महाराजांचे वंशजही पहायला मिळतात. ते आजही या किल्ल्याची देखभाल करत आहेत. अजिंक्यताराला इतिहासात एक वेगळे महत्व आहे.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा