मुंबई, 20 सप्टेंबर 2021: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात प्रवेश करण्याची मनाई केली आहे. याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवली आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत असल्यानेच ते दाबण्यासाठी ठाकरे सरकार आपल्यावर कारवाई करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
सरकारच्या या पवित्र्यावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
मी कोल्हापूरला जाणारच- सोमय्या
दरम्यान, ठाकरे सरकारने कितीही दडपशाही केली तरी देखील मी कोल्हापूरला जाणार, असा संकल्प सोमय्या यांनी केला आहे. मी मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढू नये केवळ याचसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा कोल्हापूरचा दौरा प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काहीही झाले तरी मी कोल्हापूरला जाणार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील कारखान्याची पाहणी करणारच, असा संकल्प किरीट सोमय्या यांनी सोडला आहे.
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली होती. दोन-चार आठवड्यांत याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे