सप्तशृंगी गडावर फडकला कीर्तिध्वज, सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी ४० हजार भाविकांची हजेरी

15

वणी, दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ : सप्तशृंगी गडावर नवरात्रीची सांगता महानवमीने झाली. नवमीला दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री रूपात पूजा करतात. महानवमीचा दिवस खूप विशेष आहे. या दिवशी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कन्यापूजा करावी. लहान मुलींना देवीचे रुप मानले जाते. त्यांची पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. त्याचबरोबर नवमीच्या दिवशी हवन करणे देखील शुभ मानले जाते. महानवमीच्या दिवशी सप्तशृंगी गडावर कीर्तिध्वज फडकला. यावेळी देवीच्या दर्शनासाठी ४० हजार भाविकांनी गर्दी केली होती.

आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या महानवमी निमित्त श्री सप्तशृंगी देवीची महापूजा करण्यात आली. सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा संपन्न झाली.परंपरे प्रमाणे अश्र्विन नवमीस सप्तशृंगगडावर देवीच्या शिखरावर मध्यराञी ध्वज लावला जातो.

मंदिरावर ध्वज लावण्याचा मान दरेगाव येथील गवळी परिवाराकडे आहे. मागील अनेक वर्षापासुन हा अदभुत सोहळा पार पाडण्याचे काम हे परिवार करीत आहे. वैशिष्ट्य म्हणजे या शिखरावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. सरळ शिखरावर जाणे म्हणजे मोठे धाडसाचे काम आहे. पण कोणतीही दुखापत न होता हे कार्य गेल्या कित्येक वर्षांपासून गवळी परिवाराकडून केले जात आहे. हा विलोभनीय सोहळा पहाणे म्हणजे याची देहा याची डोळा पारणे फेडणारा सोहळा असतो.

ध्वजासाठी राञी १२ वा शिखरावर जाऊन तेथील विधिवत पुजा करण्यासाठी १० फुट लांब काठी, ११ मीटर केशरी कापडाचा ध्वज, पुजेचे साहित्य जाणाऱ्या मार्गातील विविध ठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य नैवेद्य घेऊन जावे लागते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात किर्ती ध्वजाची विधिवत पूजा करून किर्तीध्वजाच्या मिरवणुकीची सुरुवात झाली. त्यानंतर हा ध्वज फडकवण्यासाठी दरेगावचे गवळी पाटील मार्गस्थ झाले. समुद्र सपाटी पासून ४ हजार ५६९ फुट उंचीवर सप्तशृंगगड आहे. वर्षभरातून दोन वेळा हा किर्तिध्वज सप्तशृंगी देवीच्या शिखरावर फडकवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री व नवरात्रौत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकवले जाते. दरेगावचे गवळी पाटील, सप्तशिखरांचा सुळका चढून निशाण लावतात.

विधीवत ध्वज लावून दरेगावचे गवळी पाटील शिखरावरून मंदिरात आल्यानंतर भाविक दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागले. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या परंपरेला वैशिष्ट्य मानले जाते. ५०० ते ६०० वर्षापेक्षा जास्त हि परंपरा राजराजेश्वरी सप्तशृंगी गडावर अखंडपणे चालू आहे. दरम्यान देवी मंदिर सभामंडपात सायंकाळी पाचला शतचंडी योग व होमहवन विधी कार्यक्रमास पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रारंभ झाला. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी खान्देश, मराठवाडा, विदर्भ त्याचबरोबर गुजरात, राजस्थान व ईतर राज्यातून भाविकांनी हजेरी लावली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा