महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किवळे, मामुर्डीतील रस्ते खड्ड्यात: वाहनचालक त्रस्त

13
Citizens question municipal corporation inaction
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किवळे, मामुर्डीतील रस्ते खड्ड्यात: वाहनचालक त्रस्त

Kiwale and Mamurdi roads filled Potholes : हिवाळा आणि उन्हाळ्यातही महापालिका प्रशासनाने दुरुस्तीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे किवळे, विकासनगर, बापदेवनगर आणि साईनगर-मामुर्डी परिसरातील रस्ते अक्षरशः खड्ड्यांत गेले आहेत. लहान-मोठे आणि धोकादायक खड्डे, तसेच खोदलेले चर डांबरीकरण न केल्याने वाहनचालकांची अक्षरशः कसरत सुरू आहे. येत्या १०-१२ दिवसांत मान्सूनचे आगमन होणार असून, जूनमध्ये डांबराचे हॉटमिक्स प्लांट बंद झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

सध्या सुरू असलेल्या वळवाच्या पावसातच खड्यांनी डोके वर काढले आहे. रावेत महामार्ग चौक ते किवळे गावठाण दरम्यानचा रस्ता गॅस वाहिनीसाठी खोदल्यानंतर त्याचे डांबरीकरण करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण करण्याच्या वल्गना हवेत विरून गेल्याचे चित्र आहे.पाण्याच्या निचरा होण्यासाठी उपाययोजनांची गरज सर्वाधिक वर्दळीचा मुकाई चौक ते इंद्रप्रभा संकुल – विकासनगर रस्ता धोकादायक खड्ड्यांनी भरला आहे.

पावसाळ्यानंतर या रस्त्याची सुधारणा करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वादळी पावसात विविध ठिकाणी पाण्याची तळी साचू लागली आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. विकासनगर ते महामार्ग रस्त्यादरम्यानच्या ८ ते १० गतिरोधकांजवळ पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचत आहे. किवळे, मामुर्डी परिसरातील सर्व रस्ते, बापदेवनगर ते आदर्शनगर रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे, मामुर्डी भागातील खड्डे, विकासनगर भागांतील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

रस्त्यावर साचलेल्या पाण्यातील खड्डे चुकविताना जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र आहे. खड्डे दुरुस्ती होत नसल्याने नागरिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त करत आहेत. किवळे-मामुर्डी परिसरातील एका किलोमीटरच्या रस्त्यावर लहान-मोठे पन्नासपेक्षा जास्त खड्डे पडले असून, गेल्या सात वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने पॅचवर्कने त्याची अवस्था ठिगळे लावलेल्या गोधडीसारखी झाली आहे. या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे