कोहलीची विराट कामगिरी, आयपीएलमध्ये ६,००० धावा करणारा पहिला फलंदाज

पुणे, २३ एप्रिल २०२१: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीनं इतिहास रचलाय. आयपीएलमध्ये ६००० धावा करणारा कोहली पहिला फलंदाज ठरला. आयपीएल -१४ च्या १६ व्या सामन्यात त्यानं हा अनोखा पराक्रम गाठला. गुरुवारी राजस्थान रॉयल्स (आरआर) विरुद्ध त्यानं ५१ धावा करताच तो या विक्रमी आकडेवारीवर पोहोचला. कोहलीनं नाबाद ७२ धावा फटकावल्या (४७ चेंडूंत) ६ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. कर्णधार कोहलीनं देवदत्त पडिकक्कल (नाबाद १०१) याच्यासमवेत १८१ धावांची अखंड भागीदारी करुन आरसीबीला १० गडी राखून विजय मिळवून दिला.

आयपीएलच्या १८८ व्या डावात विराट कोहलीनं हे स्थान संपादन केलं. कोहलीच्या आता १९६ सामन्यात ६,०२१ धावा आहेत. कोहलीनं ३८.३५ च्या सरासरीने आणि १३०.६९ च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या आहेत. यावेळी त्यानं फलंदाजीद्वारे ५ शतकं आणि ४० अर्धशतकं झळकावली आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना दुसर्‍या क्रमांकावर आहे. ‘मिस्टर आयपीएल’ रैनानं आतापर्यंत १९७ सामन्यांच्या १९२ डावांमध्ये ३३.२१ च्या सरासरीनं ५,४४८ धावा केल्या आहेत. या दरम्यान रैनाच्या फलंदाजीनं १ शतक आणि ३९ अर्धशतकं झळकावली. सुरेश रैनानं आयपीएलमध्ये प्रथम ५,००० धावांचा टप्पा गाठला.

दिल्ली कॅपिटलस (डीसी) सलामीवीर शिखर धवन या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. धवननं आतापर्यंत १८० सामन्यांच्या १७९ डावात ३५.०१ च्या सरासरीनं ५,४२८ धावा केल्या आहेत. या दरम्यान धवनने दोन शतके आणि ४३ अर्धशतकं ठोकली.

सनरायझर्स हैदराबादचा (एसआरएच) कर्णधार डेव्हिड वॉर्नर १४६ आयपीएल सामन्यांमध्ये ५,३८४ धावाांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा (एमआय) कर्णधार रोहित शर्माने २०४ सामन्यांमध्ये ३१.३९ च्या सरासरीने ५,३६८ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित पाचव्या क्रमांकावर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा