महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाचा प्ले ऑफ मध्ये प्रवेश

पुणे २२ जुन २०२३: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित, श्रीराम कॅपिटल-महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आठव्या दिवशी फिरकीपटू श्रेयस चव्हाण याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर (४-२०) कोल्हापूर टस्कर्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा ८ गडी राखून पराभव केला, यासोबतच त्यांनी तीन विजयासह प्ले ऑफ मधील आपले स्थान निश्चित केले. या विजयामुळे कोल्हापूर टस्कर्स संघाने ६ गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली, तर छत्रपती संभाजी किंग्ज संघाला स्पर्धेत एकही विजय न मिळवता आल्यामुळे त्यांचे त्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत, कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून छत्रपती संभाजी किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. कोल्हापूरच्या आत्मन पोरे याने, संभाजी किंग्जच्या सौरभ नवलेला पहिल्याच चेंडूवर पायचीत बाद करून चांगली सुरुवात केली, तर दुसऱ्या षटकात निहाल तुसमदने ओंकार खाटपेला झेल बाद करून संभाजी किंग्ज संघाला दुसरा झटका दिला. मुर्तझा ट्रंकवालाने एकाबाजू लावून धरत, ३६ चेंडूत २ चौकार व १ षटकारासह सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. त्यानंतर ओम भोसलेच्या २२ धावा, आनंद ठेंगेच्या १८ वगळता संभाजी किंग्जचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. कोल्हापूरच्या श्रेयस चव्हाण(४-२०), अक्षय दरेकर(२-१२), सिद्धार्थ दरेकर(२-८), निहाल तुसमद(१-४), आत्मन पोरे (१-२५) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा डाव १९.४ षटकात १०१ धावांवर संपुष्टात आला.

कोल्हापूर टस्कर्स संघाचे सलामीवीर फलंदाज केदार जाधव(१५धावा) व अंकित बावणे(३७ धावा) या जोडीने २६ चेंडूत ३२ धावांची भागीदारी केली. केदार जाधवला हितेश वाळुंजने त्याच्या दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा बाद केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या व स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या नौशाद शेखने २४ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या. १०१ धावांच्या आव्हानाचा सामना करताना नौशाद व अंकित यांनी दुसऱ्या गड्यासाठी ३५ चेंडूत ४१ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. अंकितला तनिश जैनने त्रिफळा बाद केले. त्यानंतर नौशाद शेख व साहिल औताडे(नाबाद २८धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी २३ चेंडूत २९ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला. सामन्याचा मानकरी श्रेयस चव्हाण ठरला.

स्पर्धेतील आजच्या सामन्याचा सविस्तर निकाल:-
छत्रपती संभाजी किंग्ज: १९.४ षटकात सर्वबाद १०१ धावा, मुर्तझा ट्रंकवाला ३२(३६,४x२,६x१), ओम भोसले २२, आनंद ठेंगे १८ (श्रेयस चव्हाण ४-२०, अक्षय दरेकर २-१२, सिद्धार्थ दरेकर २-८, निहाल तुसमद १-४, आत्मन पोरे १-२५) पराभुत वि.कोल्हापूर टस्कर्स: १४ षटकात २ बाद १०२ धावा, अंकित बावणे ३७(३३,४x५,६x१), नौशाद शेख नाबाद २८, साहिल औताडे नाबाद २२(१५,४x१,६x२), केदार जाधव १५ (हितेश वाळुंज १-२२, तनिश जैन १-२२); सामनावीर -श्रेयस चव्हाण, कोल्हापूर टस्कर्स संघ ८ गडी राखून विजयी.

न्युज अनकट प्रतिनिधी- वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा