हैदराबाद, ५ मे २०२३: आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या रंगतदार सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादवर ५ धावांनी विजय मिळवला. वरुण चक्रवर्ती हा कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून केकेआरने हैदराबादसमोर विजयासाठी१७२ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हान गाठताना शेवटच्या षटकात हैदराबादला ६ चेंडूत ९ धावांची गरज असताना गोलंदाज चक्रवर्तीने सामना फिरवला. त्यामुळे हैदराबादला ३ धावाच काढता आल्या आणि केकेआरचा ५ धावांनी विजय झाला.
सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली होती आणि मयंक अग्रवालच्या जोरावर तिसऱ्या षटकापर्यंत स्कोअर २९ धावांवर होता. यानंतर मात्र सहाव्या षटकापर्यंत संघाने ३ विकेट्स गमावले. मात्र, पॉवरप्लेमध्ये संघाने ५० चा टप्पा ओलांडला होता पण मयंक, अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्याचवेळी १३ कोटी असलेल्या हॅरी ब्रूकचा खराब टप्पा कायम राहिला आणि सलग दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर परतला.
मात्र, इथे खेळ पुन्हा बदलला. १५व्या आणि १७व्या षटकात प्रथम क्लासेन आणि नंतर मार्कराम बाद झाले. त्यानंतर १९व्या षटकात रहमानउल्ला गुरबाजने उत्कृष्ट झेल घेत मार्को जॅन्सनला पॅव्हेलियनमध्ये परतवले. शेवटच्या षटकात ९ धावांची गरज होती. शेवटच्या षटकासाठी आलेल्या वरुण चक्रवर्तीने अब्दुल समदची विकेट घेत केवळ ३ धावा देत केकेआरच्या ५ धावांनी विजय झाला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड