नुपूर शर्माविरोधात कोलकाता पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस

कोलकाता, 3 जुलै 2022: प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही. कोलकाता पोलिसांनी आता त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. कोलकाता येथे नुपूर शर्मा विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले असून, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय.

सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर एक दिवस आधी शुक्रवारी दिल्ली पोलिसांनीही पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. यापूर्वीही दिल्ली पोलिसांनी नुपूरला कलम 41A अंतर्गत तपासात सहभागी होण्यासाठी नोटीस पाठवली होती. 18 जून रोजी त्यांनी पोलिसांसमोर हजर होऊन जबाबही नोंदवला होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSO युनिटने हे वक्तव्य नोंदवलं आहे.

कोलकाता मध्ये नूपूरविरोधात 10 एफआयआर दाखल

पैगंबरांवर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी नुपूर शर्माला कोलकाता पोलिसांनी 20 जून रोजी नरकेलडांगा पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं होतं. याआधी 25 जून रोजी अॅमहर्स्ट स्ट्रीट पोलिस स्टेशनने त्यांना समन्स बजावून बोलावलं होतं, परंतु दोन्ही प्रकरणात त्यांनी येण्यास नकार दिला होता. त्यांच्याविरुद्ध कोलकात्याच्या 10 पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्माविरोधात अनेक राज्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नुपूरने या सर्व याचिका दिल्लीला हस्तांतरित करण्याची विनंती केली होती, जी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. आता नुपूरवर अटकेची टांगती तलवार आहे.

नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यामुळं देशभरातील लोकांच्या भावना भडकल्या आहेत, असं न्यायालयानं म्हटलं होतं. आज देशात जे काही घडत आहे त्याला त्याच जबाबदार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा