पुणे,प्रतिनिधी – ( ज्ञानेश्वर शिंदे ): सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा चौक येथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांवर कारवाईचा फास आवळला आहे. हडपसर वाहतूक शाखेच्या वतीने ८ चारचाकी, ६ तीन चाकी आणि ४७ दुचाकी, तसेच मास्क न लावता फिरणारे चौघे अशा ६१ जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई केल्याची माहिती हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिली.
कोळी म्हणाले की, सोलापूर रस्ता- मांजरी फाटा, सासवड रस्त्यावर फुरसुंगी कमान, मांजरी नदी पुल या ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. वाहतूक पोलीस आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी येथे तैनात आहेत. हडपसर गाडीतळ, हडपसर वेस, मगरपट्टा जंक्शन, गणेश मंदिर चौक, ससाणेनगर रस्ता येते कर्मचारी कार्यरत आहेत. अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर भादंवि १८८, २७१ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ब, महाराष्ट्र गोविड-१९ उपाययोजना २०२० कलम ११ अन्वये कारवाई सुरू केली आहे. काही वाहनधारक वाहने जप्त केल्यामुळे पैशाची मागणी केल्याची तक्रार केली जात असल्याने हवा सोडून गुन्हे दाखल केले जात असल्याचे कोळी यांनी सांगितले.
हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय भोसले, सतीश कोरंगे, अतुल साळवी, केशव वणवे, शिवाजी चव्हाण, मनोज ठाकरे, शाहिद शेख, मनिषा नलवडे, अर्चना कांबळे यांच्या पथकाने मांजरी फाटा चौकात कडेकोड बंदोबस्त ठेवला असून, विनाकारण रस्त्यावर आलेल्यांवर कडक कारवाई केली जात आहे.
कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे रुग्ण आणि बळींची संख्या वाढत असल्याने कडक पावले उचलावी लागत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कोरोना व्हायरसचा त्रास होऊ शकतो, यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, अजूनही अनेकांची मानसिकता बदलत नाही, हे दुर्दैव आहे.
असे नागनाथ वाकुडे, सहायक पोलीस आयुक्त.