पुणे : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडिया) उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.
अशा परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.आपत्तीच्याप्रसंगी प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. नावे उघड झाल्यास विनाकारण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. तेव्हा नागरिकांनी सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. कोणीही नावे उघड करता कामा नये,असे आम्ही पहिल्या दिवसांपासून आवाहन करीत आहोत ; परंतु सोशल मिडियातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत आसल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे.
या अनुषंगाने पोलिस विभागाचा सायबर सेल लक्ष ठेऊन आहे. अफवा पसरवित असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले आहे.