‘मकोका’नंतर कुख्यात नीलेश घायवळवर आता फसवणुकीचा गुन्हा!

कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर मकोका (MCOCA) कायद्यानुसार कारवाई झालेले कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या एका जुन्या गुन्ह्यात जप्त केलेल्या त्याच्या दुचाकीच्या नंबरप्लेटची चौकशी केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट झाला आहे. ही नंबरप्लेट त्या दुचाकीची नसून, ती एका चारचाकी गाडीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी घायवळविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर बंडगर (रा. इंदापूर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची चारचाकी गाडी फेब्रुवारी २०२५ मध्ये खरेदी केली आहे. २६ सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्यांना बोलावून चौकशी केली, तेव्हा त्यांच्या चारचाकीचा नंबर घायवळच्या दुचाकीला लावण्यात आल्याचे समोर आले.

दरम्यान, मकोकाची कारवाई झाल्यानंतर नीलेश घायवळ हा विदेशात पसार झाला आहे. त्याचे लोकेशन लंडन येथे असल्याच्या चर्चांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पूर्णविराम दिला आहे. घायवळ सध्या स्वीत्झर्लंडमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुणे पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याचा पासपोर्ट आणि प्रवासाची माहिती तपासण्यास सुरुवात केली आहे. एका गंभीर गुन्ह्यात मकोका लागलेला असतानाही त्याने दुसऱ्या वाहनाची नंबरप्लेट वापरून फसवणूक केल्याने त्याच्यावरील गुन्ह्यांची मालिका वाढत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे