कोवीड- १९ आढावा बैठकीचे ना. अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन

उस्मानाबाद, २६ जून २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न चालू आहे. मात्र, रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नात आहेत. वाढत्या रूग्णांवर उपचार करणे चालू असून त्यांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी पडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर विशेष अधिकार देण्यात आले असून, त्यांनी खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना कोरोना ग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालयात घ्यावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभाग्रहात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कोवीड १९ आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश खापर्डे, तहसिलदार गणेश माळी, न.प.उस्मानाबादचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे आदींच्या उपस्थिती मध्ये झाली.

उस्मानाबाद मध्ये कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी लॅबमध्ये मशीन लवकरच बसवण्यात येणार असून ती बसवण्यापूर्वी संबंधित तज्ञांना प्रशिक्षणासाठी लातूर किंवा सोलापूर येथे पाठवण्यात येणार असून, या मशीन बसविल्यानंतर तपासणी करण्यास वेळ वाया जाणार नाही. हे मशीन बसविण्यासाठी डॉ. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रो बायोलॉजिकल तज्ञाची नियुक्ती करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या बैठकीत दिल्या. तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये सुरू आहेत की नाही याबाबत खात्री करून सर्व रूग्णांना आवश्यक त्या सर्व आरोग्यसेवा देण्यात याव्या, सोबतच उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता प्रशासनाने करावी अशा प्रकारच्या सूचना देखील ना. अमित देशमुख यांनी दिल्या.

आरोग्य विभागाकडे औषधांचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे त्यामुळे आरोग्य विभागाने औषधांचा मुबलक साठा करून ठेवावा. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण व होम कोरंटाईनची परिस्थिती कशी आहे याची माहिती घेऊन संस्थात्मक विलगीकरण कक्षातील व्यक्तींना आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी, सोबतच होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींशी आशा वर्कर अंगणवाडीच्या माध्यमातून संपर्कात राहण्यात यावे, अशा प्रकारचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी माननीय देशमुख साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी देखील कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या लॉकडाऊन पासून ते आज पर्यंत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यासोबतच कोरोना बाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक गावस्तरावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही वडगावे यांनी दिली.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा