KGF फेम कृष्णा जी राव यांचे निधन

मुंबई, ८ डिसेंबर २०२२ : ब्लॉकबस्टर ठरलेल्या KGF या सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेले कृष्णा जी राव यांचे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा जी राव यांचे बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा जी राव यांना काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमधील सीता सर्कलजवळील विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

कृष्णा गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. त्यांनी अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. KGF मधील अभिनेता यशसोबतचे त्यांचे काम विशेष लक्षात राहील. या चित्रपटानंतर कृष्णा जवळपास ३० चित्रपटांमध्ये दिसले होते. केजीएफनंतर दुसऱ्या आठवड्यातच त्यांनी त्यातील जवळपास १५ सिनेमे साइन केले होते.

  • KGF मधील भूमिकेबाबत :

केजीएफमध्ये कृष्णा जी राव यांची भूमिका छोटी असली तरी महत्त्वपूर्ण होती. सिनेमात रॉकीच्या आयुष्यात आलेल्या महत्त्वाच्या क्षणी त्याची कान उघडणी करण्यासाठी कृष्णा जी रावची खास एंट्री झाली होती. सिनेमात त्यांनी आंधळ्या म्हाताऱ्याची भूमिका साकारली होती. रॉकीमध्ये असलेल्या चांगल्या माणसाची त्याला ओळख करून देण्यात कृष्णा जी राव यांची भूमिका सिनेमात महत्त्वपूर्ण ठरली होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा