वनपुरी येथे कृष्णाष्टमी उत्साहात साजरी

पुरंदर, दि. १२ ऑगस्ट २०२०: टाळ – मृदुंगाचा जयघोष, विविधरंगी फुलांची आरास, राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि पुष्पवृष्टी करीत पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे श्री कृष्णाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात मूर्तींची महापूजा, वीणा पूजन, भजन संगीत तसेच दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात कृष्णाष्टमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी मूर्तींची विधिवत पूजा करण्यात आली तर रात्री मंदिरात श्री कृष्ण जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मंदिराचे पुजारी जगन्नाथ रूढ यांनी सर्व विधी पार पार पाडले. तसेच वीणा पारायण आणि भजन संगीत आयोजित करण्यात आले.  रात्री १२ वा. श्री कृष्ण मूर्तीवर टाळ मृदुंगाच्या जयघोषात पुष्पवर्षाव करण्यात आला. त्यानंतर गावातील महिला मंडळाच्या वतीने जन्माचा पाळणा म्हणण्याचा कार्यक्रम झाला. तसेच यावेळी महिलांनी पारंपारिक फुगडी आणि फेर धरून व विविध गाणे म्हणत आनंद व्यक्त केला. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून सुंठवडा देण्यात आला.

या वेळी भजनी मंडळाचे प्रमुख हभप सुदाम कुंभारकर, हार्मोनियम वादक भिमाजी कुंभारकर, मृदुंग वादक संभाजी महामुनी, माणिकराव कुंभारकर, तुकाराम महामुनी, महादेव कुंभारकर, नामदेव मगर, सुरेश महामुनी, वर्षाताई कुंभारकर, सुमन रूढ, संजना शेंडकर, सुनंदा कुंभारकर तसेच गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बुधवार दि. १२ रोजी सायंकाळी दहीहंडी फोडून आणि उपस्थितांना लाह्यांचा प्रसाद देवून कृष्ण जन्म सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीणा पारायण सप्ताह रद्द.

कृष्णाष्टमी निमित्त दरवर्षी ७ दिवस गावोगावी वीणा पूजन करून पारायण सोहळे आयोजित करण्यात येतात. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. यावर्षी संपूर्ण जगात कोरोनाने फैलाव केल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातील कृष्णाष्टमी निमित्त होणारे वीणा पारायण साप्ताह रद्द करण्यात आला होता. त्याऐवजी जयंतीच्या दिवशी मूर्ती पूजा करून सायंकाळी वीणा पूजन करण्यात आले. त्यानंतर भजन संगीत आणि जन्म सोहळा पार पडला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा