इंदापूर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेल्या तीन वर्षापासून शेतकरी नागरिक यांना वरदान ठरणारे कृषी प्रदर्शन, राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोचले आहे. मात्र हेच कृषी प्रदर्शन राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे माजी सहकार मंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने इंदापूर कृषी महोत्सव २०२० कृषी जनावरे प्रदर्शन घोडेबाजार व डॉग शो चे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके, मदनसिंह मोहिते पाटील, मयुरसिंह पाटिल,पृथ्वीराज जाचक, उदयसिंह पाटील राजवर्धन पाटील, श्रीमंत ढोले, नानासाहेब शेंडे,विलास वाघमोडे,मंगेश पाटील,महेंद्र रेडके, अशोकराव वनवे, रामभाऊ पाटील यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक तसेच शेतकरी व नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, जर राज्यात नव्याने सरकार स्थापन झाले आहे ते पण नैसर्गिक सरकार आहे. हे सरकार सत्तेवर येऊन देखील चाचपडत आहे. या सरकारमध्ये नुसते खाते वाटप झाले बंगले वाटप झाले. मात्र सामान्य जनतेचे शेतकऱ्याचे प्रश्न या सरकारच्या अजिंठ्यावर नाहीत. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई हे सरकार योग्य पद्धतीने करू शकले नाही जाहीर केलेली मदत देऊ शकले नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची व राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी फसवी कर्जमाफी ची घोषणा करून जनतेची दिशाभूल केली आहे असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने काम करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकवलेल्या मालाला भाव व शेतकऱ्यांना विश्वास सरकारने द्यावा असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी सलग तीन वर्ष कृषी क्षेत्रातील प्रदर्शन आयोजित करून एक वेगळा नावलौकिक प्राप्त केला आहे. त्यामुळे सध्या येथील प्रदर्शन राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. मात्र हेच प्रदर्शन राज्यात पहिल्या क्रमांकाचे येण्यासाठी जे काही मदत लागेल ती नक्की दिली जाईल अशीही ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शेतकरी हा प्रगतशील शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढवावी आधुनिक पद्धतीने शेती करावी हा पायडा घालण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शेती जनावरे घोडे गाई यासंदर्भातील वरदान ठरणारे इंदापूर बाजार समितीचे प्रदर्शन आहे. त्यामुळे तालुक्याच्या वैभवात भर पडते आहे.तर तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या माध्यमातून मोठा आधार व न्याय मिळतो आहे असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले. राज्यात काम करण्याची संधी द्या
गेल्या तीन वर्षापासून घोडेबाजार व कृषी प्रदर्शन इंदापूर बाजार समिती पार पाडत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना नागरिकांना युवक वर्गाला मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. वर्षातून एकदा शेतकऱ्यांना पाहण्याची नवीन गोष्टी अवगत करण्याची संधी प्राप्त हा उपक्रम सुरू ठेवला आहे. मात्र थोड्या मताने विधानसभेचा पराभव हर्षवर्धन पाटील यांना करावा लागला. त्यामुळे तालुक्यातील तमाम जनता खुशीत नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांना राज्य स्तरावर काम करण्याची पक्षाने संधी द्यावी. तर माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना ही राज्यात चांगल्या पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी आपल्या भाषणात केली.