जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरू यांची कुरापत, रामदास शिवरायांचे गुरू, शिवरायांनी स्वतःचे राज्य रामदासांच्या चरणी अर्पण केल्याचे वादग्रस्त वक्तव्य.

मुंबई ६ मे २०२३: देशात छत्रपती शिवरायांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्ये थांबताना दिसत नाही. संत रामदास हे शिवरायांचे गुरू होते. शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य त्यांच्या चरणी अर्पण केले होते, असे वादग्रस्त वक्तव्य सद्गुरू नावाने प्रसिद्ध असलेल्या जग्गी वासुदेव यांनी केले आहे. त्यामुळे नवे वादंग निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी झाल्या प्रकाराबाबत एक ट्विट केले आहे. जग्गी वासुदेव यांनी नेमके काय म्हटले आहे, याच्या व्हिडिओची एक लिंकही आपल्या ट्विटमध्ये आव्हाडांनी टाकली आहे. आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक खोटी अॅनिमेशन कथा प्रसारित केली आहे. ज्यानुसार रामदास हे शिवाजींचे गुरू होते, रामदासांना भिक्षा मागताना पाहून शिवरायांनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले, पुढे रामदासानीं स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र महाराजांना देवून त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले. अशी खोटी कथा प्रसारित केली. तसेच जग्गी वासुदेव यांनी संत रामदास यांचा शिवाजी महाराजांचे गुरू असा उल्लेख केला.

जग्गी वासुदेव हे सद्गुरू नावाने प्रसिद्ध आहेत. ते ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. जगभरात ते योग, समुपदेशनाचे कार्यक्रम घेतात. सामाजिक, पर्यावरणविषयक, शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांची सेव्ह सॉइल चळवळीमुळे वेगळी ओळख आहे. त्यांच्या अध्यात्मातील कामाबद्दल भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले आहे.

झालेल्या वादग्रस्त प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी कडक कारवाईची मागणी केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी खोटी माहिती वारंवार प्रसारित करून महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल, अन्यथा याने जनक्षोभ उसळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा