नवी दिल्ली : अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या वृत्ताने सेलिब्रिटींसह सामान्यांनाही मोठा धक्का बसला आहे. खासगी आयुष्यातील ताणतणाव आणि इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याने नैराश्यग्रस्त होऊन त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असे अनेक तर्कवितर्क लावले गेले.
याबाबत कुशलची पत्नी ऑड्री डोल्हेन हिने कुशलच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “तो आमच्या नात्यात अपयशी ठरला”, असं म्हणत त्याच्या आत्महत्येसाठी मला जबाबदार का ठरवलं जावं असा सवाल केला आहे.
‘पिपिंगमून’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, “माझ्यावर का टीका होतेय हे मला माहित नाही. आमच्या नात्यात कुशल अपयशी ठरला. त्याला कुटुंबाचं गांभीर्य कळत नव्हतं. तो एक वडील म्हणूनही निष्काळजी होता. त्याच्या मुलाच्या भवितव्याचा त्याने कधीच विचार केला नव्हता.
मी कियानला (मुलगा) कधीच त्याच्याशी बोलण्यापासून थांबवलं नव्हतं. कुशलला मी शांघायला येऊन आमच्यासोबत राहण्यास सांगितलं होतं.पण त्यात त्याला कधीच रस नव्हता. माझ्याच खर्चावर आमचं घर चाललं होतं.” पत्नी आणि मुलापासून विभक्त झाल्याने कुशल नैराश्यात गेला असं त्याच्या मित्रांचं म्हणणं होतं.
कुशलने ‘लक्ष्य’,’सलाम-ए-इश्क’,’काल’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत ‘लव मॅरेज’, ‘सीआयडी’, ‘देखो मगर प्यार से’, ‘कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोर’, ‘श्श्श. फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा ७’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’,’इश्क मै मरजावा’ अशा अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.