नवी दिल्ली, 9 ऑक्टोंबर 2021: लखीमपूर खेरी प्रकरणावर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, दरम्यान कोर्टाने यूपी सरकारला जोरदार फटकारलं. यूपी सरकारने आतापर्यंत केलेल्या कारवाईवर ते समाधानी नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय. मुख्य आरोपी आशिष मिश्राला आतापर्यंत अटक करण्यात आली नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली. आता दसऱ्याच्या सुटीनंतर न्यायालय पुढील प्रकरणाची सुनावणी 20 ऑक्टोबरला करणार आहे.
यूपी सरकारच्या वतीनं वरिष्ठ वकील हरीश साळवे न्यायालयात हजर झाले. मृत शेतकर्यांच्या शवविच्छेदन अहवालाचा संदर्भ देत ते म्हणाले की, हा मृत्यू गोळी लागल्यानं झाला नाही. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, मृत्यू गोळ्या किंवा इतर काही कारणांमुळे झाला आहे पण प्रकरण खुनाचं आहे, यात तर काही संशय नाही ना ? असं दिसतं की यूपी सरकारने समाधानकारक आणि योग्य पाऊल उचललं नाही. आम्हाला हे प्रकरण सीबीआयकडे द्यायचं नाही. गंभीरतेमुळे, टिप्पणी देखील करू इच्छित नाही. पण यूपी सरकारने आरोपींविरुद्ध गंभीर प्रकरणाप्रमाणे त्वरित कारवाई करायला हवी होती.
आशिष मिश्रा याला उद्यापर्यंत वेळ देण्यात आला – साळवे
हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, आरोपी आशिष मिश्राला नोटीस पाठवण्यात आली आहे, तो आज येणार होता. पण त्याने उद्या सकाळपर्यंत वेळ मागितली आहे. आम्ही त्याला उद्या, शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ दिला आहे. अशा गंभीर आरोपांवर जबाबदार सरकार आणि प्रशासनाला वेगळी वागणूक का दिली जाते, असा प्रश्न सीजेआयने विचारला. कोर्टाने सांगितलं की, जेव्हा प्रकरण 302 चं आहे, मग बाकीच्या प्रकरणांप्रमाणे अटक का केली गेली नाही.
सरन्यायाधीशांचा यूपी सरकारला प्रश्न
तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे? 302 प्रकरणात पोलीस सहसा काय करतात? सरळ अटक केली जाते? आरोपी कोणीही असो, कायद्यानं मार्गक्रमण केलं पाहिजे.
न्यायालयाने म्हटलं – सरकारच्या कारवाईवर समाधानी नाही
सरन्यायाधीशांच्या खंडपीठानं दिलेल्या आदेशात म्हटलंय की, सरकारच्या कारवाईवर न्यायालय समाधानी नाही. न्यायालयाने म्हटलं की, डीजीपीला विचारलं पाहिजे की घटनेचे पुरावे नष्ट केले जाऊ नयेत, त्याची काळजी घेतली पाहिजे. कोर्टाने यूपी सरकारलाही विचारलं की कोणती एजन्सी तपास करेल? म्हणजेच, इतर काही एजन्सीला तपास देण्याचे संकेत दिले.
यूपी सरकारने न्यायालयात स्थिती अहवालही दाखल केला. यामध्ये शवविच्छेदन अहवालाचा उल्लेख होता. घटनास्थळावरून दोन रिकामी काडतुसं सापडल्याचंही सांगण्यात आले. याशिवाय एसआयटीच्या स्थापनेबाबत चर्चा झाली. एसआयटीमध्ये केवळ ‘स्थानिक पोलीस अधिकारी’ ठेवण्यात आले आहेत, असं न्यायालयाने फटकारलं.
आशिष मिश्रा याच्या घरी दुसरी नोटीस
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या घरी दुसरी नोटीस लावण्यात आली. काल सकाळी 10:00 पर्यंत त्यांचा मुलगा आशिष मिश्रा गुन्हे शाखा कार्यालय गाठणार होता, पण तो पोहोचला नाही. आशिष मिश्रा न पोहोचल्यानं लखीमपूर पोलिसांनी दुसरी नोटीस लावली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे