लखीमपूर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फेटाळला आशिष मिश्राचा जामीन, 1 आठवड्यात शरण येण्याचे आदेश

लखीमपूर खेरी प्रकरण, 19 एप्रिल 2022: लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराचा आरोपी आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका मिळालाय. सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राचा जामीन फेटाळलाय. त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करावं लागणार आहे. आशिष मिश्रा हा गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे. आशिष मिश्रा याचं नाव लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांना मारल्याच्या प्रकरणात आलं होतं.

4 एप्रिल रोजी या खटल्यातील सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता.

आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, जो आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलाय. अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडित पक्षाची दखल घेतली नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. पीडित पक्षाचे म्हणणे ऐकून घेतलं नाही.

सर्वोच्च न्यायालय म्हणालं- उच्च न्यायालयाने पुन्हा विचार करावा

आशिष मिश्रा याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्याच वेळी, पीडित पक्षांचे वकील दुष्यंत दवे यांनी, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना यावेळी हे प्रकरण इतर कोणत्याही खंडपीठासमोर जावं, अशी विनंती केली. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, असा आदेश देणं योग्य होणार नाही. आम्हाला खात्री आहे की तेच न्यायाधीश या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करू इच्छित नाहीत.

8 जणांचा मृत्यू

3 ऑक्टोबर 2021 रोजी लखीमपूरच्या टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात 8 लोकांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू याने आपल्या जीपने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश एसआयटीने 5000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. एसआयटीने आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी म्हणून नाव दिलं होतं. एवढंच नाही तर एसआयटीच्या म्हणण्यानुसार आशिष घटनास्थळी उपस्थित होता. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये आशिष मिश्रा याला जामीन मंजूर केला होता.

जामिनाच्या विरोधात पीडित कुटुंबातील लोकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा