लखीमपूर हिंसाचार: आशिष मिश्राला दिलासा नाही, न्यायालयाने दिली 3 दिवसांची पोलीस कोठडी

नवी दिल्ली, 12 ऑक्टोंबर 2021: यूपीच्या लखीमपूर खेरी प्रकरणात भाजप नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षाच्या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्राला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. लखीमपूरच्या सीजेएम कोर्टाने आशिषला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेली एसआयटी टीम आता आशिष मिश्राला अधिक प्रश्न विचारण्यास सक्षम असेल.

एसआयटीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आशिष मिश्राला न्यायालयात हजर केलं. अधिकाऱ्यांनी तपास करण्यासाठी आशिष मिश्राची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने त्याला तीन दिवसांच्या कोठडीवर पाठवलं. वकील एसपी यादव म्हणाले की, आशिष मिश्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी देताना न्यायालयाने काही अटीही लादल्या आहेत.

आशिष मिश्राचे वकील अवधेश सिंह यांच्यासह पोलिसांच्या वतीनं अतिरिक्त संचालक अभियोजन राजेश श्रीवास्तव आणि सहाय्यक फिर्यादी अधिकारी एसपी यादव हेही उपस्थित होते. पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडसाठी अर्ज केला होता. सुनावणीलाही काही काळ व्यत्यय आला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगशी कनेक्ट होण्याच्या समस्येमुळं हे घडलं.

‘फक्त 12 तासच झाली चौकशी, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणं बाकी’

पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की, आशिष मिश्राची केवळ 12 तास चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये त्याने उत्तर दिले नाही. यामुळं त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे. मात्र, न्यायालयाने 14 दिवसांऐवजी तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. आशिषच्या वकिलांनी सांगितलं की, पोलिसांना आशिषला विचारण्यासाठी फक्त 40 प्रश्न होते, जे विचारले गेले. 12 तासांच्या चौकशीत फक्त एकदाच पाणी देण्यात आल्याचं वकील म्हणाले. ब्रेकशिवाय सतत प्रश्न विचारले गेले, ज्याची उत्तरं दिली गेली. आशिषच्या वकिलाच्या वतीने सांगण्यात आलं की जर पोलिसांना चौकशी करायची असेल तर ते तुरुंगात जाऊन ते करू शकतात.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्यावर विरोधक ठाम

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या बडतर्फीवर काँग्रेससह विरोधक ठाम आहेत. लखीमपूर हिंसाचार प्रकरणी सुरुवातीपासून केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला करणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनीही सोमवारी तीन तासांचं मूक उपोषण सुरू केलं. त्यासाठी त्या सोमवारी दुपारी लखनौच्या हजरतगंज येथील गांधी पुतळ्याजवळ पोहोचल्या. आधीच शेकडो कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.

प्रियंका व्यतिरिक्त सपा, बसपासह इतर पक्षही लखीमपूर हिंसाचार प्रकरणात सरकारला लक्ष्य करत आहेत. मात्र, अजय मिश्रा आणि आशिष सुरुवातीपासूनच निर्दोष म्हणत आहेत. या घटनेत चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांना आपला जीव गमवावा लागला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा