पुणे, १७ ऑक्टोंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी जरंगे पाटील आणि मराठा समाज अजूनही लढत आहे. आता मराठा आरक्षणासाठी मोठा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात भव्य सभा होणार आहे. त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे भव्य सभा घेतली होती. या सभेत त्यांनी सरकारला आरक्षणासाठी आणखी दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यापूर्वी २० ऑक्टोबरला पुण्यात बैठक होणार आहे. आता महाराष्ट्राच्या नजरा या सभेकडे असतील कारण जरांगे पाटील पहिल्यांदाच पवारांच्या बालेकिल्ल्यात, पुण्यात सभा घेणार आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार या सभेचे ठिकाणही निश्चित करण्यात आले असुन पुणे जिल्ह्यात जरांगे पाटील यांची पहिलीच सभा असेल. या सभेसाठी मराठा क्रांती मोर्चाने जोरदार तयारी सुरू केलीय. ऑक्टोबरची उष्णता असतानाही मराठवाड्यातील सराटीसारख्या गावात लाखोंच्या संख्येने लोक जमले. यामध्ये सर्व वयोगटातील मराठा समाजातील लोक अंतरवली सराटी सभेला आले होते. यामध्ये तरुणांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
लाखोंची तीच गर्दी आता पुण्याच्या गावी असणार आहे. त्यामुळे राजगुरुनगर येथील सभेला ५ लाख मराठा बांधव येण्याचा अंदाज मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केला. या सभेसाठी १०० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. नुकतीच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड