लक्षणं नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना आता होम आयसोलेशनचा’ पर्याय

19

सोलापूर, दि.१३ जून २०२०: अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबाबत निर्णय घेत राज्य शासनाने होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सौम्य पद्धतीची लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आता घरातच विलगीकरण केले जाणार आहे. राज्य शासनाने परिपत्रक जारी करत याविषयी सूचना दिल्या.याला होम आयसोलेशन असे संबोधले जाणार आहे.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरीच विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचे राज्य शासनाचे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सूचनांचे पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की,  लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य वा अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध करून देता येईल.

मात्र, त्यासाठी संबंधित रुग्णांच्या घरी त्यांच्या विलगीकरणासाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींकरिता विलगीकरणासाठी योग्य सुविधा उपलब्ध असाव्यात. घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती हवी. त्याने मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे व ते सतत कार्यरत असेल याविषयी दक्ष राहावे.

किती दिवस होम क्वारंटाइन?
होम क्वारंटाइन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना कधी मुक्त करावे याविषयीही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला लक्षणे सुरू झाल्याच्या १७ दिवसांनंतर किंवा लक्षणे नसतील तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून १७ दिवसांनंतर मुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर होम क्वारंटाइन व्यक्तीस मुक्त करावे. होम क्वारंटाइनचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असेही शासनाने परिपत्रकात म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी